प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचे गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी पहाटे निधन झालं. त्यांनी नवी मुंबई येथे वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर शुक्रवार, २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचे पार्थिव गुरुवारी दुपारी ३ नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल.
बाबा महाराज सातारकर यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील आणि सातारकर फड परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली ह. भ. प. भगवती महाराज आणि रासेश्वरी सोनकर, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी आपले आयुष्य अध्यात्माचा प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. दरम्यान, यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचे निधन झाले होते. त्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली.
बाबा महाराज सातारकर यांचा ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचं मूळ नाव होतं. मात्र, पुढे त्यांना ‘बाबा महाराज सातारकर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. विठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्वरी यामध्येच बाबा महाराजांनी आयुष्य घालवले. अलिकडे वय झाल्यामुळे बाबा महाराज कीर्तनासाठी उभे राहात नव्हते. त्यांची ही परंपरा त्यांचा नातू पुढे नेत आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेत बंदुकधाऱ्याच्या अंदाधुंद गोळीबारात २२ ठार
वकील सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणी तिघांना अटक
बीड मध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात १० जणांचा मृत्यू
प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण हे अहोभाग्य!
बाबा महाराज सातारकर यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातू शोक व्यक्त करण्यात येत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एक्सवर (ट्विटर) आपल्या भावना व्यक्त करताना बाबा महाराज सातारकर यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही एक्सवर बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.
किर्तनकलेचा खऱ्या अर्थाने परिपूर्ण आविष्कार, असंख्य भाविकभक्तांचे श्रद्धास्थान, भागवत धर्माचा वैश्विक राजदूत आणि आधुनिक काळातील माउली महावैष्णव तसेच वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. गुरुवर्य श्री बाबा महाराज सातारकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या निधनाने… pic.twitter.com/DUSJtWXX1D
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 26, 2023