प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी जीवन संपवले. कर्जतमधील त्यांच्या एन. डी. स्टुडीओ येथे त्यांनी त्यांचे जीवन संपवले. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे.
मराठमोळे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम केले आहे. नरेंद्र मोदी यांनी नितीन देसाई यांचं काम पाहून त्यांना गुजरातमध्ये येण्याचा सल्ला दिला होता. एका मुलाखतीमध्ये नितीन देसाई यांनी त्यांच्या एकूणच जीवनाविषयी भाष्य केले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा किस्सा सांगितला होता.
नरेंद्र मोदी २००३ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी नितीन देसाई यांनी त्यांच्यासाठी ८० फूटांचे मोठे लोटस स्ट्रक्चर (कमळ) तयार केलं होतं. त्यावेळी नरेंद्र मोदी यांना त्यांची कल्पना प्रचंड आवडली होती. नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात त्यांनी नितीन देसाई यांचे कौतुक देखील केले होते. तसेच मित्र म्हणून त्यांचा उल्लेख मोदींनी केला होता. त्यावेळी नितीन देसाई आणि मोदी यांची भेट होऊ शकली नाही पण, कार्यक्रमानंतर बरोबर दोन दिवसांनी नितीन देसाई यांना एक फोन आला आणि ‘मित्र नितीन देसाईंना नरेंद्र मोदींचा नमस्कार’ असा समोरुन आवाज आला. नरेंद्र मोदींनी देसाई यांना फोन करून भेटायला बोलावले होते.
नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर जवळपास ४५ मिनिटांपर्यंत त्यांची चर्चा झाली होती. या चर्चेमध्ये शेवटच्या ४ मिनिटांमध्ये त्यांनी देसाई यांना विचारलं होतं, तुला काय करायची इच्छा आहे? त्यावर देसाई यांनी मोदींना एक प्रेझेंटेशन दाखवलं होतं. प्रेझेंटेशन पाहून खुश झालेल्या मोदींनी देसाई यांना ऑफर दिली. “महाराष्ट्र आणि राजस्थानला लागून गुजरातची जितकी बॉर्डर आहे ती तुझी. मी तुला ५०० एकर जमीन देतो. तू तिथे फिल्मसिटी उभी कर.” परंतु, गुजरातमधील खराब हवामान आणि प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेता तिथे स्टुडिओ उभारण शक्य नसल्याचे सांगत देसाई यांनी नम्रपणे ही ऑफर नाकारली.
दरम्यान, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही नितीन देसाई यांनी त्यांच्यासोबत काम केलं. पंतप्रधान मोदींसोबत त्यांनी ६७ इव्हेंट केले. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इनॉग्रेशन प्रोग्रामसाठीही नितीन देसाईंनी काम केलं होतं.
हे ही वाचा:
मुंबई- जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरणातील चारही मृतांचा शवविच्छेदन अहवाल समोर
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या
मणिपूर हिंसाचाराचा अर्थव्यवस्थेवर परिणाम; जीएसटी संकलनात घट
इन्स्टाग्रामवर झाली ओळख अन् साडेसहा लाखाला घातला गंडा !
नितीन देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या स्टुडीओतील कर्मचाऱ्यांना देसाई यांनी आत्महत्या केल्याचं कळल्यानंतर त्यांनी लगेचच स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार पोलीस पुढील कारवाई करत आहेत. मात्र, नितिन देसाई यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.