आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा नियम लागू केला आहे. टी-२० आणि एकदिवसीय या क्रिकेटच्या दोन प्रकारांमध्ये आता वेळेचे बंधन कायमस्वरूपी असणार आहे. जून महिन्यात सुरू होणाऱ्या टी- २० विश्वचषक स्पर्धेपासून नवा नियम कायस्वरूपी लागू होणार आहे. आयसीसीच्या बैठकीत शुक्रवारी याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याआधी हा नियम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला होता.
या नियमानुसार, एक षटक संपल्यानंतर ६० सेकंद होण्याच्या आतमध्ये दुसरे षटक सुरू होणे अनिवार्य असणार आहे. नियमभंग झाल्यास संघाला दंड बसणार आहे. आयसीसीकडून सांगण्यात आले आहे की, “डिसेंबर २०२३ पासून वेळेच्या बंधनाच्या नियमाला प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली होती. या नियमाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला फायदा झाला. एकदिवसीय क्रिकेटच्या एका सामन्यात तब्बल २० मिनिटे वाचली. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषकापासून हा नियम आता कायमस्वरूपी करण्यात येणार आहे.
आयसीसीच्या नव्या नियमानुसार, गोलंदाजी करत असलेल्या संघाने षटक संपल्यानंतर ६० सेकंदांच्या आत दुसऱ्या षटकाला सुरुवात करायला हवी. ६० सेकंद उलटून जात असल्यास पंचांकडून गोलंदाजी करत असलेल्या संघाला दोन वेळा इशारा देण्यात येईल. एका डावामध्ये तीन वेळा ६० सेकंदांची मर्यादा ओलांडल्यास क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाला पाच धावांचा दंड बसणार आहे.
हे ही वाचा..
लष्कराचे गणवेश विकून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या संशयिताला अटक
“बाल स्वरूपातील मूर्ती साकारताना प्रभू रामचंद्रांनी खूप परीक्षा घेतली”
दिल्लीत रस्त्यावरच्या नमाजाला घातला पायबंद!
अनेक कुलकर्णी मुंबई संघात येतील पण धवल कुलकर्णी सारखे कोणी नाही
शिवाय आयसीसीकडून काही घटनांसाठी या नवीन नियमापासून विशेष सूट देण्यात आली आहे. नवा फलंदाज खेळपट्टीवर आल्यास, ड्रिंकसाठी ब्रेक घेतल्यास, खेळाडूला दुखापत झाल्यास अशा घटनांमध्ये वेळेचे बंधन ग्राह्य धरले जाणार नाही.