राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीला धावून आले. हे सर्व पर्यटक महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचे होते. पर्यटन कंपनीच्या फसवणुकीमुळे हे पर्यटक नेपाळमध्ये अडकून पडले होते. अनेक नेत्यांना आणि त्यांच्या पीएला फोन करून मदत मागितली. पण प्रतिसाद मिळेना. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज केला आणि त्यांनी सर्व यंत्रणा हलविली.
देवेंद्र फडणवीस यांनी फोन फिरवल्यानंतर नेपाळपासून ते उत्तर प्रदेशापर्यंत हे भाविक सुखरूप आले आणि पुढे त्यांच्या रायगड जिल्ह्यातील आपल्या गावी देखील सुखरूप पोहचविण्यात आले. काठमांडूमध्ये देवेंद्र फडणवीस आमच्या मदतीला धावून आले, अशी भावना पर्यटकांनी व्यक्त केली आहे.
रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील ५८ भाविक नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी म्हणून गेले होते. त्यांच्या गटात ३५ महिला आणि २३ पुरुष होते. उत्तर प्रदेशमधील गोरखपूरहून नेपाळपर्यंत सर्व पर्यटक सुखरूप पोहचले. त्यानंतर त्यांच्या प्रवासालाही सुरुवात झाली. त्यांनी लुम्बिनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना या ठिकाणी दर्शन घेतले.
मात्र, काठमांडूला आल्यावर त्यांना राधाकृष्ण ट्रॅव्हल्सच्या एका बसमध्ये बसविण्यात आले. तुमच्या पर्यटन कंपनीकडून पैसे आलेले नाहीत. सहा लाख रुपये दिले नाहीत तर सोडणार नाही, असे या ट्रॅव्हल्सचा मालक अंकीत जायस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी या पर्यटकांना धमकावयला सुरूवात केली. या सर्वांनी गावाहून निघतानाच संपूर्ण पैसे भरलेले होते. मात्र, त्यांची फसवणूक झाली होती हे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी ओळखीच्या लोकांमार्फत नेत्यांना आणि त्यांच्या पीएला फोन करायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेना. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून सर्व प्रसंग सांगितला. त्यांचा तातडीने प्रतिसाद आला. त्यांनी माहिती घेतली. लगेचच फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी या भाविकांशी संपर्क साधला.
पुढे या सर्वांची योग्य व्यवस्था करून विशेष बसने त्यांना गोरखपूरला पोहचविण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तेथील जिल्हाधिकारी स्वत: भेटीला आले. त्यांनी दोन दिवस भाविकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली.
हे ही वाचा:
अबूधाबीच्या हिंदू मंदिराचे मोदी करणार उद्घाटन
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या दादरच्या दुकानदारांवर बडगा!
आगामी काळात इस्रो ५० उपग्रह अवकाशात सोडणार
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने गुजरात, कर्नाटकला टाकले मागे!
दरम्यान, फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोरखपूरपासून मुंबईपर्यंत गाडीला एक खास बोगी जोडण्याची विनंती केली. रेल्वेने त्याप्रमाणे भाविकांसाठी गोरखपूरहून मुंबईपर्यंत रेल्वेची एक बोगी आरक्षित करून दिली. अखेर दोन दिवस प्रवास करून सर्व पर्यटक आपल्या गावी सुखरुपपणे पोहोचले.