एकीकडे संभाजीनगरात पाण्याच्या समस्येने लोक त्रस्त असल्याचे समोर येत असताना तेथील महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांच्या वाढदिवसासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचे समोर आल्याने लोकांमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे.
जी. श्रीकांत यांच्या वाढदिवसासाठी पालिका अधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. त्यासाठी २.४३ लाखांची वर्गणीही काढण्यात आल्याचे कळते. त्यामुळे एकीकडे संभाजीनगरात अनेक समस्या असताना आयुक्तांच्या वाढदिवसासाठी एवढा खर्च कसा काय केला जातो, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा:
हैदराबादमध्ये आरटीआय कार्यकर्त्याचे अपहरण, मग खाणीत फेकले, बीआरएस कार्यकर्त्याचा पती आरोपी
ओडिशा अपघात प्रकरणी चौकशी सुरू असलेला सिग्नल इंजिनिअर कुटुंबासह बेपत्ता
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताची गरज
दर्शना पवारच्या मृत्यूचे कारण समोर
जी श्रीकांत यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व पालिका अधिकारी तत्पर होते. संभाजीनगरात पाण्याच्या समस्येने लोक ग्रासले आहेत. १०-१० दिवस पाणी मिळत नाही. पाण्याचे संकट आहे. लोक हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण करत आहेत. पण अशा कठीण परिस्थितीत वाढदिवसासाठी मात्र भरपूर खर्च केला जात आहे, याबद्दल लोकांच्या मनात संतापाचे वातावरण आहे.
या वाढदिवसासाठी गुलाबाच्या पाकळ्या, मोठ्या रांगोळ्या, केक, अधिकाऱ्यांचा तामझाम, सुशोभिकरण असा सगळा बेत करण्यात आला होता. पालिका अधिकारी जनतेसाठी तत्पर राहात नसताना या वाढदिवसावर खर्च कसा काय केला जातो, असा सवाल विचारला जात आहे. संभाजीनगरात पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम अनेक दिवस सुरू आहे. नव्या आयुक्तांकडून या प्रश्नांवर तोडगा काढला जाईल अशी अपेक्षा असताना आयुक्तही अशा खर्चिक वाढदिवसात सामील होतात, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी शहरात होर्डिंग्जही लावण्यात आली. सामाजिक संस्थांनी ही होर्डिंग्ज लावली होती.