‘इस्रो’वर दररोज होतात १०० सायबरहल्ले

रॉकेट तंत्रज्ञानामुळे इस्रोवर सायबरहल्ल्याची शक्यता अधिक

‘इस्रो’वर दररोज होतात १०० सायबरहल्ले

सायबरगुन्ह्यांचे प्रमाण देशात खूप वाढले आहे. इस्रोही या सायबरहल्ल्यांपासून वाचू शकलेले नाही. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी इस्रोवर दररोज १००हून अधिक सायबरहल्ले होतात, अशी माहिती दिली. केरळमध्ये आयोजित १६व्या सायबर संमेलनात ते बोलत होते. रॉकेट तंत्रज्ञानामुळे इस्रोवर सायबरहल्ल्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

सायबर गुन्हेगार अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि चिपचा वापर करतात. मात्र इस्रो अशा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. इस्रोमध्ये मजबूत सायबरसुरक्षेचे जाळे आहे. इस्रोने रॉकेटच्या आतील हार्डवेअर चिप्सच्या सुरक्षाव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी इस्रोकडून विविध चाचण्या केल्या जात आहेत.

हे ही वाचा:

‘अमेरिका सदैव इस्रायलच्या पाठिशी’!

कॅनडाच्या भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्यास सुरुवात

इस्रायलच्या महिलेला हमासच्या अतिरेक्यांनी मारले; व्हीडिओमुळे संताप

प्रथमच आशियाई स्पर्धेत उतरलेल्या भारतीय क्रिकेट संघाला सुवर्णपदक

पुढील २० वर्षांत भारताचे अंतराळ स्थानक

पुढील २० ते २५ वर्षांत भारत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारेल, असा विश्वास सोमनाथ यांनी व्यक्त केला आहे. गगनयान मोहिमेद्वारे भारताला अंतराळात मानवाला पाठवण्याचे बळ मिळेल. ही यशस्वी झाल्यास इस्रो अंतराळ स्थानक स्थापन करण्याकडे लक्ष केंद्रित करेल. यासाठी पुढील २० ते २५ वर्षांत अंतराळ स्थानक उभारण्याचे विविध टप्पे पूर्ण केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गगनयानासाठी लवकरच मनुष्यरहित चाचण्या

देशाच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी मानवरहित उड्डाणाच्या चाचण्या लवकरच सुरू केल्या जाणार असून, ‘फ्लाइट टेस्ट व्हेईकल अबॉर्ट मिशन १’ची तयारीही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे. पहिल्या फ्लाइट टेस्ट व्हेईकलची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे, असेही इस्रोने एक्स या सोशल मीडिया मंचावर सांगितले.

Exit mobile version