पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांच्या सोबतच्या पॉडकास्टमध्ये पाकिस्तानवर जोरदार टीका करत दहशतवादावर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शांतता प्रस्थापित करण्याच्या भारताच्या प्रत्येक प्रयत्नाला पाकिस्तानकडून शत्रुत्व आणि विश्वासघाताचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तान भारताविरुद्ध प्रॉक्सी युद्ध करत आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसोबतच्या भारताच्या बिघडलेल्या संबंधांबद्दल सविस्तरपणे सांगितले आणि शेजारी देशावर राज्य पुरस्कृत दहशतवाद आणि अयशस्वी शांतता प्रयत्नांसाठी टीका केली. तीन तासांच्या पॉडकास्ट भागाचा भाग असलेल्या या चर्चेत भारताचे पाकिस्तानशी असलेले ऐतिहासिक संबंध, राजनैतिकतेला चालना देण्याचे भूतकाळातील प्रयत्न आणि द्विपक्षीय संबंधांच्या भविष्यासाठी पंतप्रधान मोदींच्या दृष्टिकोनाचा आढावा घेण्यात आला. फ्रिडमन यांनी पंतप्रधानांना दोन राष्ट्रांमधील तणावपूर्ण संघर्षाबद्दल आणि मैत्री, शांतीचा मार्ग दिसतो का याबद्दल विचारले. यावेळी नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर टीका केली.
पंतप्रधान मोदींनी आठवण करून दिली की, त्यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांचे पाकिस्तानी समकक्ष नवाझ शरीफ यांना आमंत्रित केले होते. या मागील उद्देश हा होता की, ते भारत- पाकिस्तान संबंधांसाठी एक नवीन सुरुवात करू शकतील. पण, शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रत्येक प्रयत्नाला शत्रुत्व आणि विश्वासघाताचा सामना करावा लागला. प्रामाणिकपणे आशा आहे की, त्यांना शहाणपण येईल आणि ते शांतीचा मार्ग निवडतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तानातील लोकही शांततेची अपेक्षा ठेवून आहेत, कारण ते संघर्ष, अशांतता आणि दहशतीत जगण्याला कंटाळले आहेत. भारताने पाकिस्तानला वारंवार सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबवण्यास सांगितले आहे आणि हिंसाचार, दहशतवाद आणि जबरदस्तीमुक्त वातावरणातच चर्चा पुढे जाऊ शकते असे म्हटले आहे.
आपल्या पहिल्या कार्यकाळात पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी घेतलेल्या पुढाकारांबद्दल बोलताना मोदींनी सांगितले की, त्यांना अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शपथविधी सोहळ्यासाठी बोलावणे हे असे राजनैतिक पाऊल होते जे गेल्या काही दशकांमध्ये कधीही पडले नव्हते. ज्या लोकांनी एकेकाळी माझ्या परराष्ट्र धोरणाबद्दलच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते तेच लोक जेव्हा मला कळले की मी सर्व सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित केले आहे तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. भारताचे परराष्ट्र धोरण किती स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण बनले आहे याचा हा पुरावा होता. यामुळे जगाला शांतता आणि सौहार्दासाठी भारताच्या वचनबद्धतेबद्दल स्पष्ट संदेश गेला, परंतु आम्हाला अपेक्षित परिणाम मिळाला नाही, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
हिंदुत्ववादी संघटना एकटवल्या; ‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतरासाठी कोल्हापुरात निघणार मोर्चा
देशासाठी धोकादायक असलेल्या नार्को दहशतवादाला आळा घालणे महत्त्वाचे
साडेचार महिने मी फक्त एकदाच जेवतो!
औरंग्याची खुलताबाद येथील कबर “राष्ट्रीय वारसा” म्हणून जतन करायची का ?
पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील ९/११ हल्ल्याचा सूत्रधार अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेन याचे उदाहरण दिले. ओसामाला पाकिस्तानातील अबोटाबाद येथे अमेरिकन नेव्ही सीलने त्याच्या कंपाऊंडमध्ये गोळ्या घालून ठार मारले. यावर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “११ सप्टेंबरच्या हल्ल्याचा विचार करता हल्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन होता. तो शेवटी कुठे सापडला? त्याने पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला होता. जगाने हे ओळखले आहे की, एका प्रकारे, दहशतवाद आणि दहशतवादी मानसिकता पाकिस्तानमध्ये खोलवर रुजलेली आहे. पाकिस्तान आज केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठी अशांततेचे केंद्रबिंदू बनला आहे,” अशी टीका करत नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला सुनावले आहे.