अश्विनची १०० नंबरी चमक, भारताने इंग्लंडला गारद करत मालिका जिंकली

एक डाव आणि ६४ धावांनी टीम इंडियाने विजयाचा झेंडा रोवला

अश्विनची १०० नंबरी चमक, भारताने इंग्लंडला गारद करत मालिका जिंकली

धरमशाला येथील पाचव्या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडचा धुव्वा उडवला. पाचव्या कसोटीत इंग्रजांना एक डाव आणि ६४ धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. पहिल्या डावात २५९ धावांनी पिछाडीवर असलेला इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात १९५ धावांवर ऑलआऊट झाला. भारताने ही मालिका ४-१ अशी मोठ्या दिमाखात खिशात टाकली. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात फक्त जो रूटनेच काहीसा संघर्ष केला. मात्र, इंग्लंडचे इतर फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर हतबलच दिसत होते. इंग्लंड फलंदाज टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांपुढे अक्षरशः नाचत होते.

बॅजबॉलफ्लॉप
इंग्लंडकडून जो रूटने दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा केल्या. त्याने ८४ धावांची खेळी केली. पण इंग्रजांची टॉप ऑर्डर पुन्हा फ्लॉप झाली. सलामीवीर जॅक क्रॉलीला भोपळाही फोडता आला नाही. अश्विनने जॅक क्रॉलीला एकही धावा न करता तंबूचा रस्ता दाखवला. डकेटने फक्त २ धावा केल्या. ओली पोप १९ धावा करून स्वस्तात माघारी परतला. जॉनी बेअरस्टोने मात्र ३९ धावांची छोटी पण चांगली खेळी केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने २ धावा केल्या. त्यानंतर बेन फोक्सला रवी अश्विनने बाद केले.

१००व्या कसोटीत अश्विन चमकला


भारताकडून दुसऱ्या डावात अश्विन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अश्विनने ५ फलंदाजांना बाद केले. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना २-२ बळींचे यश मिळाले. रवींद्र जडेजाने शोएब बशीरला बाद केले.

भारताने पाच कसोटी सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली आहे. मात्र या मालिकेची सुरुवात भारतासाठी चांगली झाली नव्हती. इंग्लंडने पहिल्या कसोटीत भारताला पराभूत केले होते. पण त्यानंतर टीम इंडियाने शानदार पुनरागमन करून इंग्रजांना पाणी पाजले.

हेही वाचा :

दिव्यांग महिलांसाठी अत्याधुनिक शिलाई मशिन्स

मला ऐकून लोक कंटाळले आहेत या मोदींच्या विधानावर मैथिली म्हणाली बिल्कुल मग…

नीरव मोदीने ८० लाख डॉलर बँक ऑफ इंडियाला देण्याचे आदेश

रस्त्यावर नमाज अदा करण्यापासून रोखणारा नवा व्हिडीओ आला समोर

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची शतके


भारतीय संघाने पहिल्या डावात ४७७ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला २५९ धावांची भरभक्कम आघाडी मिळाली. भारताकडून शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी शतके झळकावली. रोहित शर्माने १०३ धावांची खेळी केली. तर शुभमन गिलने ११० धावा केल्या. याशिवाय देवदत्त पडिक्कल आणि सरफराज खान यांनी अर्धशतक झळकावले. इंग्लंडकडून शोएब बशीर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शोएब बशीरने पाच विकेट्स मिळाल्या. जेम्स अँडरसन आणि टॉम हॉर्टली यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. बेन स्टोक्सने रोहित शर्माला बाद केले.

फिरकीसमोर इंग्लंडचे फलंदाज नाचले

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या. इंग्लंडकडून सलामीवीर जॅक क्रॉलीने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली. पण त्याशिवाय इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला पन्नास धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारताकडून कुलदीप यादव पहिल्या डावात सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कुलदीप यादवने ५ विकेट्स घेतल्या. अश्विनने ४ फलंदाजांना बाद केले. रवींद्र जडेजाने जो रूटला बाद केले.

Exit mobile version