इंग्लंडने जिंकला दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप; पाकिस्तानवर सहज मात

दुसरा टी-२० वर्ल्डकप सामना जिंकला

इंग्लंडने जिंकला दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप; पाकिस्तानवर सहज मात

इंग्लंडने टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानवर पाच विकेट्सनी मात करत सहज ही स्पर्धा जिंकली. टी-२० वर्ल्डकप जिंकण्याची ही इंग्लंडची दुसरी वेळ आहे. पाकिस्तानला प्रथमच फलंदाजी करताना १३७ धावांवर रोखून इंग्लंडने ही धावसंख्या ५ विकेट्स आणि एक षटक राखून पार केली.

मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने एकतर्फी सामना जिंकला होता. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध त्यांचे पारडे जड होतेच. बेन स्टोक्सच्या नाबाद ५२ धावा आणि त्यांचा डावखुरा गोलंदाज सॅम करन (१२ धावांत ३ बळी) आणि लेग स्पिनर आदिल रशिद (२२ धावांत २ बळी) यांच्या चमकदार कामगिरीमुळे इंग्लंडने हा विजय मिळविला. इंग्लंडची ही टी-२० वर्ल्डकप जिंकण्याची दुसरी वेळ आहे. २०१०मध्ये त्यांनी टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. २०१९मध्ये त्यांनी ५० षटकांचा वर्ल्डकपही जिंकला होता.

याच मेलबर्न क्रिकेट मैदानावर तीस वर्षांपूर्वी इंग्लंडला पाकिस्तानकडून हार सहन करावी लागली होती. ५० षटकांच्या त्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये स्वीकाराव्या लागलेल्या त्या पराभवाची परतफेड इंग्लंडने टी-२० वर्ल्डकपमध्ये केली.

हे ही वाचा:

रेशनधान्य दुकानही आता हायफाय, मिळणार सर्वसामान्यांना वायफाय

अभिनेत्री कल्याणी जाधवचा अपघाती मृत्यू

उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्ग स्फोटाने उडवला

न थकण्याचे रहस्य सांगताना मोदी म्हणाले, मी दोन-चार किलो शिव्या खातो!

 

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १३७ धावापर्यंत मजल मारली. त्यात शान मसूदने ३८ धावांची सर्वोच्च खेळी केली बाकी फलंदाजांना मात्र अपेक्षित खेळी करता आली नाही. त्यामुळे २० षटकांत १३७ धावांपर्यंतच पाकिस्तान पोहोचू शकला.

या माफक धावसंख्येला उत्तर देताना इंग्लंडला फार कष्ट पडले नाहीत. बेन स्टोक्सने नाबाद ५२ धावांची खेळी करताना आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. त्यात ५ चौकार आणि एक षटकार लगावला.

पण या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला तो ३ बळी घेणारा इंग्लंडचा गोलंदाज सॅम करन. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूही तोच ठरला.

Exit mobile version