न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंडकडचाही पाकिस्तान दौरा रद्द?

न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंडकडचाही पाकिस्तान दौरा रद्द?

सुरक्षेचे कारण देत न्यूझीलंडने पाकिस्तान दौरा रद्द करुन क्रिकेट टीम मायदेशी बोलावण्याचा निर्णय घेतला. आता इंग्लंडही त्यांचा नियोजीत असलेला पाकिस्तान दौरा रद्द करण्याबाबत विचार करत आहे. पुढील २४ ते ४८ तासांत इंग्लंडचे क्रिकेट बोर्ड त्यांचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंडची टीम पाकिस्तानमध्ये तीन वन डे आणि पाच टी २० मॅच खेळणार होती. यातील पहिल्या मॅचसाठी न्यूझीलंडची टीम रावळपिंडी येथे पोहोचली होती. पण न्यूझीलंडच्या गुप्तचर यंत्रणेने खेळाडूंच्या जिवाला धोका असल्याचा इशारा दिला. हा इशारा मिळाल्यानंतर न्यूझीलंड सरकारने तडकाफडकी टीम मायदेशी बोलावण्याचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडकडून स्टेडियममध्ये काहीतरी घातपात होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंना स्टेडियममध्ये न जाता हॉटेलमध्येच थांबण्याचा सल्ला देण्यात आला. त्याचवेळी क्रिकेट चाहत्यांनादेखील स्टेडियममध्ये प्रवेशबंदी करण्यात आली. संबंधित माहिती आल्यानंतर अवघ्या काही क्षणात संपूर्ण दौराच रद्द झाल्याची माहिती न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या कानावर पडली.

न्यूझीलंडचा दौरा रद्द झाल्यामुळे इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने नव्याने पाकिस्तानमधील सुरक्षेची समिक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंच्या जिवाला धोका असल्यास खेळाडू पाकिस्तानमध्ये जाणार नाही, असे सूतोवाच इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. अंतिम निर्णय लवकरच जाहीर होणार आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेने मागितली ड्रोन हल्ल्याबाबत माफी

पश्चिम बंगाल पोलिसांना स्थानिकांशी गैरवर्तन महागात पडले

बीकेसी पूल दुर्घटनेवरील चर्चा थांबवण्यासाठी युतीची पुडी सोडली

जोगेश्वरीमधून सातवा दहशतवादी पकडला

इंग्लंड ऑक्टोबर २०२१ मध्ये दोन टी २० खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. पण हा दौरा रद्द झाला तर लागोपाठ दोन देशांच्या टीमचे पाकिस्तान दौरे रद्द होतील. याचा पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर प्रतिकूल परिणाम होईल, असे या विषयातील अभ्यासकांचे मत आहे.

Exit mobile version