टी २० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ३६ धावांनी पराभूत केले आहे. बार्बाडोसच्या केनसिंगटन ओव्हलमध्ये हा सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजीला येऊन २० षटकांत सात विकेट गमावून २०१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडला सहा विकेट गमावून २० षटकांत केवळ १६५ धावा करता आल्या. या स्पर्धेत पहिल्यांदाच २००ची धावसंख्या गाठण्यात आली असून ती किमया ऑस्ट्रेलियाने केली आहे.
आत्तापर्यंत स्पर्धेत १६ सामने झाले आहेत. आता ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना ११ जून रोजी नामिबियाविरुद्ध तर, इंग्लंडचा १३ जूनला ओमानविरुद्ध होईल. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ गट ब मधून दोन सामन्यांतील दोन विजय आणि चार गुणांसह अग्रस्थानी पोहोचला आहे. तर, स्कॉटलंड दुसऱ्या स्थानी आहे. नामीबिया दोन गुणांसह तिसऱ्या आणि इंग्लंड एका गुणासह चौथ्या स्थानी आहे. ओमानने अद्याप खाते उघडलेले नाही. इंग्लंड आणि स्कॉटलंडमधील सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे इंग्लंडला सुपर आठमध्ये जाण्यासाठी अडथळा येऊ शकतो.
ऑस्ट्रेलियाची खेळी
नाणेफेक हरून पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने २० षटकांत सात विकेट गमावून २०१ धावा केल्या. मात्र एकही ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ४० धावा करू शकला नाही. तरीही संघाने २००हून अधिक धावा केल्या. ट्रेव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर याने संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पाच षटकांत ७० धावांची भागीदारी केली. हेड १८ चेंडूंत ३४ व डेव्हिड वॉर्नर १६ चेंडूंत ३९ धावा करून बाद झाला. हेडने दोन चौकार आणि तीन षटकार लगावले तर, वॉर्नरने दोन चौकार आणि चार षटकार लगावले. हेडला आर्चरने तर, वॉर्नलला मोईन अली याने त्रिफळाचित केले. त्यानंतर कर्णधार मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या दरम्यान ६५ धावांची भागीदारी झाली. ही जोडी लियाम लिविंगस्टोनने याने फोडली. त्याने मार्शला बाद केले. मार्शने २५ चेंडूंत दोन चौकार व दोन षटकारांसह ३५ धावांची खेळी केली.
आदिल रशीदने मॅक्सवेलला सॉल्टकरवी झेलबाद केले. त्याने २५ चेंडूंत तीन चौकार व एक षटकारासह २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला १६८ धावसंख्या असताना पाचवा धक्का बसला. क्रिस जॉर्डनने टिम डेविडला लिविंगस्टोनकरवी झेलबाद केले. तो केवळ ११ धावाच करू शकला. स्टोइनिसने १७ चेंडूंमध्ये दोन चौकार व दोन षटकारांसह ३० धावांची खेळी केली. जॉर्डनने त्याला बाद केले. टी २० स्पर्धेतील जॉर्डनची ही शंभरावी विकेट. पॅट कमिन्स खातेही उघडू शकला नाही. तर, मॅथ्यू वेड १० चेंडूंमध्ये तीन चौकार ठोकून आणि १७ धावा करून नाबाद राहिला.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात भाजपला पराभूत करण्यासाठी मुस्लिमांची एकजूट
हमासच्या कैदेत असलेल्या चार इस्रायली नागरिकांची सुटका
“देवेंद्र फडणवीस पळणारा व्यक्ती नसून लढणारा व्यक्ती”
आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव जाणार शपथविधीला
इंग्लंडची खेळी
ऑस्ट्रेलियाला प्रत्युत्तर देताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. कर्णधार जोस बटलर आणि फिल सॉल्ट याने ४३ चेंडूंत ७३ धावा केल्या. त्यानंतर ऍडम जॅम्पा याने फिल सॉल्ट आणि बटलरला बाद केले. सॉल्ट २३ चेंडूंत चार चौकार व दोन षटकारांसह ३७ धावा करून बाद झाला. तर, बटलर याने २८ चेंडूंत पाच चौकार व दोन षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. त्यानंतर विल जॅक्स १० धावा, जॉनी बेयअरस्टो सात, मोईन अली २५ धावा आणि लियाम लिविंगस्टोन १५ धावा करून बाद झाला. तर, हॅरी ब्रूकने १६ चेंडूंत २० आणि क्रिस जॉर्डन याने एक नाबाद धाव केली. ऑस्ट्रेलियाच्या वतीने पॅट कमिन्स आणि जॅम्पा याने दोन-दोन विकेट घेतल्या. तर, जोश हेजलवुड आणि मार्कस स्टोइनिसने एकेक विकेट घेतली.