इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट याच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने लीड्स कसोटी सामन्यातील आपली पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ८ बाद ४२३ हा इंग्लंड संघाचा धावफलक होता. त्यांनी भारतीय संघावर तब्बल ३४५ धावांची आघाडी मिळवली आहे. त्यामुळे या कठीण परिस्थितीतून भारतीय संघ कशाप्रकारे बाहेर पडतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या षटकापासूनच इंग्लंडने आपल्या दबदबा कायम ठेवला आहे. इंग्लिश गोलंदाजांच्या तुफान कामगिरीमुळे पहिल्याच दिवशी भारतीय संघाची दाणादाण उडवत फक्त ७८ धावांत खेळ गुंडाळला. तर त्यानंतर इंग्लिश फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत धावा कुटल्या.
इंग्लंडच्या पहिल्या चारही फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. सुरुवातीला बर्न्स आणि हमीद या सलामीवीर जोडीने शतकी भागीदारी करत संघाला आघाडी मिळवून दिली. तर त्यानंतर मलानच्या साथीने जो रूटने त्यावर कळस चढवला. कर्णधार जो रूटने या सामन्यात तुफान शतक ठोकले. तर बर्न्स, हमीद आणि मलानने अर्धशतकी कामगिरी केली.
या कामगिरीमुळे सामन्यात इंग्लंड संघाचे पारडे जड आहे. सामन्याचा आजचा तिसरा दिवस महत्वाचा ठरणार आहे. इंग्लंडचे उर्वरित दोन फलंदाज लवकरात लवकर बाद करून भारताला फलंदाजीसाठी यावे लागेल. यावेळी भारतीय फलंदाजांची खरी कसोटी असणार आहे. त्यामुळे सामन्याचा तिसरा दिवस खळ पहाणे रंजक ठरणार आहे.