भारत आणि इंग्लंड मधील तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंड संघाने यजमान भारताचा धुव्वा उडवला आहे. इंग्लंडने भारता विरोधात ८ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडचा फलंदाज जॉश बटलर हा या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा सामना प्रेक्षकांविना खेळवण्यात आला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा टी-२० सामना मंगळवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सुरवातीपासूनच इंग्लंड संघाने सामन्यावर आपली पकड बनवून ठेवली होती. भारताकडून कर्णधार विराट कोहली व्यतिरिक्त कोणीही उल्लेखनीय कामगिरी करू शकले नाहीत. कोहलीने ४६ चेंडूत नाबाद ७७ धाव केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावरच भारताने २० षटकांत ६ बाद १५६ इतकी धावसंख्या केली.
या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडने आपल्या दोनच विकेट गमावल्या. जॉश बटलर याने इंग्लंडकडून ५२ चेंडूत नाबाद ८३ धावांची खेळी केली. तर जॉनी बेस्ट्रोने त्याला चांगली साथ दिली. बेस्ट्रोने २८ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. बटलरला त्याच्या खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.