रोजगारावरून खोटे नरेटिव्ह सेट करणारे गुंतवणुकीचे दुश्मन आहेत. इन्फ्रास्ट्रकरच्या निर्मितीतील दुश्मन आहेत, भारताच्या विकासाचे दुश्मन आहे. त्यांचे धोरण तरुणांचा विश्वासघात आणि रोजगार रोखणारे आहे. त्याची आता पोलखोल होत आहे. पूल तयार होत असेल, रेल्वे ट्रॅक होत असेल रोड होत असेल तर कुणाला तरी रोजगार मिळतोच. देशात इन्फ्रास्ट्रक्चरची गती वाढत आहे, तसेच रोजगाराची गतीही वाढत आहे. येत्या काळात अधिक संधी निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा पार पडला. तब्बल ३० हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर आदी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पंढरपूरच्या वारकऱ्यांना शुभेच्छा देत पंढरीच्या विठ्ठलाला प्रणाम केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, मुंबईत आज ३० हजार कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्याची संधी मिळाली आहे. या प्रकल्पातून मुंबई व नजीकच्या क्षेत्रातील कनेक्टीव्हीटी चांगली होईल. या रोड व रेल्वे प्रकल्पांसह महाराष्ट्रातील तरुणांसाठीच्या कौशल्य विकासाची योजना आहे. या योजनेतून महाराष्ट्रात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होईल, दोन ते तीन आठवड्यांपूर्वी केंद्र सरकारने वाढवण बंदराला देखील मंजुरी दिली. तब्बल ७६ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे १० लाख रोजगार निर्मिती होईल. गेल्या एका महिन्यात मुंबई ही देश व विदेशातील गुंतवणूकदारांची साक्षीदार राहिली आहे, आमच्या सरकारच्या तिसऱ्या टर्मचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले आहे. लोकांना माहिती आहे, एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकते, मी तिसऱ्यांदा शपथ घेतली तेव्हा सांगितले होते. आम्ही तिप्पट वेगाने काम करु, आज आपण हे होताना पाहत आहोत, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी बोलताना म्हणाले, महाराष्ट्राजवळ गौरवशाली इतिहास आहे, महाराष्ट्रात सशक्त वर्तमान आहे, आणि महाराष्ट्राजवळ समृद्ध विकासाचे स्वप्न आहे. महाराष्ट्राचा विकसित भारतात मोठा वाटा आहे. महाराष्ट्रात उद्योग, शेती, फायनान्स सेक्टरची पॉवर आहे. म्हणून मुंबई ही पॉवर हब आहे, महाराष्ट्राला जगाचे सर्वात मोठे आर्थिक पॉवर हाऊस तयार करायचे आहे, मुंबईला जगाचे फिनटेक कॅपिटल करण्याचे माझे स्वप्न आहे, असे म्हणत मोदींनी मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवण्याचे स्वप्न बाळगल्याचे म्हटले.
हे ही वाचा:
“विरोधकांचे नरेटिव्ह खोडून काढू”
ओडिशाच्या राजपालांच्या मुलावर मारहाणीचा आरोप!
अंबानींच्या विवाह सोहळ्यात काँग्रेस नेत्यांसह इंडी आघाडीचे वऱ्हाड
छत्रपतींचे किल्ले हे शौर्याचे साक्षीदार आहेत, येथे मेडिकल टुरिझमला संधी आहे. महाराष्ट्र ही विकासाची नवी गाथा लिहिणार आहे, आपण याचे सहयात्री असून आजचे प्रकल्प हे त्याचेच प्रतिक आहेत. २५ वर्षे या शतकाचे उलटले असून वेगाने विकास होण्याची लोकांची अपेक्षा आहे. पुढील २५ वर्षांत लोकांना देशाला विकसित झालेले पाहायचे आहे. त्यामध्ये मुंबईकरांचा वाटा मोठा असेल, येथील लोकांचे आयुष्यमान चांगले असावे, हा आमचा प्रयत्न आहे. म्हणून मुंबईकरांसाठी पायाभूत सुविधा देत आहेत, कोस्टल अटल सेतू आता पूर्ण झाले आहेत. जेव्हा अटल सेतू तयार होत होता, तेव्हा विरोधात गोष्टी बोलल्या गेल्या, काम थांबवण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण, या अटल सेतूचे किती फायदे होत आहेत, हे दिसत आहेत. रोज २० हजार गाड्या या सेतूवर प्रवास करत आहेत. २० ते २५ लाख रुपयांचे इंधन दररोज वाचत आहे. पनवेलला जाण्यासाठी केवळ ४५ मिनिटांचा कालवधी लागत आहे. म्हणजे वेळेची व पर्यावरणाची बचत होतेय, याच प्रकारे मुंबईची वाहतूक व्यवस्था आधुनिक करत आहोत, मेट्रोचाही विस्तार वेगाने होतोय, असे मोदींनी म्हटले.
मुंबईत १० वर्षापूर्वी फक्त ८ किलोमीटर मेट्रो लाईन होती. आज ती ८० किलोमीटर झाली आहे. मुंबईत जवळपास २०० किलोमीटर मेट्रो नेटवर्कवर काम होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व नागपूर रिडिव्हेलपमेंट वेगाने काम प्रगतीपथावर आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवर नव्या फलाटाचे लोकार्पण झाले, त्यामुळे २४ कोच असलेली रेल्वे याठिकाणी धावू शकेल. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची संख्या तिप्पटीने वाढली आहे. बोरिवली ठाणे ट्विन टनल हा प्रगती व प्रकृती यांची सांगड घालण्याचं हे चांगले उदाहरण आहे.
पालखी मार्ग वारकऱ्यांसाठी लवकरच खुले !
आज पंढरपूर वारीत लाखो वारकरी भक्तीभावाने सामील झाले आहेत. पुणे ते पंढरपूर हा प्रवास सुकर व्हावा, यासाठीची काळजी सरकार घेत आहे. संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम सुरू असून लवकरच हे मार्ग वारकऱ्यांसाठी खुले केले जातील, असे मोदींनी म्हटले. यावेळी, मराठीत वारकऱ्यांना शुभेच्छाही दिल्या.
महाविकास आघाडीची बोलती बंद !
महाराष्ट्र सरकारने प्रत्येक वर्षी १० लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे. या प्रशिक्षणादरम्यान शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, कौशल्य विकास प्रशिक्षण ही आपली गरज आहे. आरबीआयच्या रिपोर्टरनुसार देशात ८ कोटी नवे रोजगार मिळाले आहेत. खोटा नरेटीव्ह पसरवू पाहणाऱ्यांची या आकड्यांमुळे बोलती बंद झाली आहे. हे विरोधक देशाच्या विरोधात आहेत, त्यांची निती विकासाविरोधात आहे. पण त्यांची पोलखोल होत आहे, लोक त्यांना नाकारत आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.