दहशतवादी आणि अंडरवर्ल्डसाठी कर्दनकाळ ठरलेले निवृत्त आयपीएस अधिकारी आफताब अहमद खान (ए. ए. खान) यांचे शुक्रवार, २१ जानेवारी रोजी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. खान हे ८१ वर्षांचे होते. आफताब खान हे १९६३च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी १९९५ मध्ये पोलीस सेवेतून राजीनामा दिला होता. मुंबई दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करणारे आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची विशेष ओळख होती.
मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याने आफताब खान यांच्या निधनाबाबत माहिती दिली. आफताब यांना काही दिवसांपूर्वी करोना संसर्गाची लागण झाली होती. त्यानंतर अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांनी दोन आठवड्यांपूर्वीच करोनावर मात केली होती. मात्र, शुक्रवारी पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले पण त्याआधीच त्यांचे निधन झाले. आफताब खान यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि मुलगी असा परिवार आहे.
आफताब खान हे १९९७ मध्ये सेवेतून निवृत्त होणार होते पण त्याआधीच १९९५ मध्ये त्यांनी पोलीस दलातून राजीनामा दिला होता. त्यावेळी ते पोलीस महानिरीक्षक या पदावर होते. मुंबई दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्याचे श्रेय खान यांना दिले जाते. देशातील दहशतवाद विरोधीचे हे पहिले पथक ठरले होते. १९९० मध्ये फिलाडेल्फिया आणि लॉस एंजल्स पोलिसांच्या स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिकल टीम (स्वाट) याच्या धर्तीवर त्यांनी एटीएसची स्थापना केली होती.
हे ही वाचा:
किडनीच्या बहाण्याने गायिकेने घातला साडेआठ लाखांचा गंडा
मॉरिशसच्या मेट्रो स्टेशनला ‘महात्मा गांधीं’ चे नाव
इंडिया गेटवर नेताजींचा भव्य पुतळा….पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
डी गँगचा कुख्यात गँगस्टर माया डोळस याच्या एन्काऊंटर आफताब खान चर्चेत आले होते. खान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कमांडोजचे साह्य घेऊन १६ नोव्हेंबर १९९१ रोजी लोखंडवाला कॉम्प्लेक्स भागात माया डोळसचे एन्काऊंटर केले होते. या घटनेवर शूटआऊट ऍट लोखंडवाला हा सिनेमाही आला होता.