बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा ‘एन्काउंटर’

पोलीस अधिकारी जखमी

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा ‘एन्काउंटर’

बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेवर गोळीबार केल्याची माहिती आहे. पोलीस रिमांडवर नेत असताना आरोपीने पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेत गोळीबार केला, यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. यापूर्वी आरोपीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पोलिसांकडून आरोपीचा एन्काउंटर केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणी उपमुख्यमंत्री-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज ठाणे क्राईम ब्रांच युनिटने तळोजा जेलमधून आरोपी अक्षय शिंदेचा ताबा घेतला होता. आरोपीच्या पहिल्या पत्नीच्या तक्रारी प्रकरणी चौकशीकरिता कोर्टाच्या परवानगीनंतर अक्षय शिंदेचा ताबा क्राईम ब्रांचने घेतला होता. आज (२३ सप्टेंबर) ५.३० च्या सुमारास क्राईम ब्रांचचे पथक आरोपीचा ताबा घेवून तळोजा मधून निघाले होते. या ताफ्यामध्ये एपीआय दर्जाचे अधिकारी निलेश मोरे हे होते. त्याच दरम्यान, आरोपीने अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून त्यांच्या पायावर गोळी मारली. एकूण तीन राउंड फायर केल्याची माहिती आहे. अखेर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळीबार केला. यामध्ये आरोपीचा मृत्यू झाला, मात्र, अधिक माहिती अजून काही आलेली नाही.

आरोपीला जखमी अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल (कळवा) येथे नेण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये जखमी झालेले पोलीस अधिकाऱ्यांचा तेथेच उपचार सुरु होते, मात्र नंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, आरोपीच्या एन्काउंटरवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

हे ही वाचा : 

तीन बांगलादेशी नागरिकांसह दोन भारतीय दलालांना अटक

गाझियाबादमध्ये लघवी-थुंकीच्या कारनाम्यांविरोधात हिंदू संघटनांची महापंचायत, बहिष्काराची घोषणा!

रोहित पवार, जरांगेंना शुगर फ्री ज्युस घेऊन जा!

जम्मू काश्मीरात मंदिर उघडणे योग्य नाही, पूजेमुळे अडचण होते…मुश्ताक लोनचा माज

Exit mobile version