महाराष्ट्राच्या मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याच्या बातमीने सारा महाराष्ट्र हादरला होता. या धक्क्यातून जनता सावरत असतानाच आता शिवसेना शासित औरंगाबाद महापालिकेतही असाच दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. त्यामुळे शासकीय इमारतींमध्ये नेते, अधिकारी, कर्मचारी हे काम करण्यासाठी जातात की ओल्या पार्ट्या करण्यासाठी जातात? असा सवाल विचारला जात आहे.
बुधवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी औरंगाबाद महापालिकेच्या आवारात रिकाम्या दारूच्या बाटल्या सापडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. औरंगाबाद महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या आवारात हा बाटल्यांचा खरच आढळून आला आहे. यामध्ये देशी आणि विदेशी अशा दोन्ही प्रकारच्या दारूच्या बाटल्या आहेत. त्या संपूर्ण प्रकाराबद्दल औरंगाबादकर हे संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेत नेमके काय चालते? महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजानंतर महापालिकैची इमारत हा मद्यपींचा अड्डा झालाय का? असे सवाल नागरिक विचारताना दिसत आहेत. राजकीय नेते मंडळी तसेच विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी हे महापालिकेत काम करायला जातात की पार्टी करायला? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दरम्यान या साऱ्या प्रकारची चौकशी होऊन संबंधित दोषींवर कारवाई केली जाणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा:
राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, अशी ठाकरे सरकारची चंपी
मंत्रालयातही सापडल्या होत्या दारूच्या बाटल्या
या घटनेच्या एक दिवस आधी अशाच प्रकारे दारूच्या बाटल्यांचा ढीग सापडला होता. यामुळे राज्यभरातून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठली असून प्रश्नांचा भडीमार केला जात होता. ‘मंत्रालयाचे मद्यालय’ करण्यात आल्याची टीका यावेळी झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर आता औरंगाबाद महापालिकेतही अशाच प्रकारचा बाटल्यांचा खच सापडल्याने राज्यातील अजून कोणकोणत्या शासकीय इमारतींमध्ये तळीरामांचे अड्डे आहेत? असे नागरिक विचारताना दिसत आहेत.