कोरोनाच्या महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. आर्थिक संकटांना सामोरे जात क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंनाही बिघडलेल्या आर्थिक चक्राचा चांगलाच फटका बसला आहे. या खेळाडूंना मदत करणाऱ्या सामाजिक संस्थांकडील मदतनिधी कमी झाल्याने मागील काही महिन्यांपासून खेळाडूंचे प्रशिक्षण थांबले आहे. तसेच या मुलांच्या पोषण आहाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
शासकीय सुविधांचा अभाव आणि आर्थिक क्षमता कमकुवत असलेल्या खेळाडूंना काही संस्था मदत करत असतात. मात्र, खेळाडू होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मदत करत असलेल्या सामजिक संस्थाना मिळणारा आर्थिक आधार कमी झाल्यामुळे खेळाडूंचा हा आधारही आता कमकुवत झाला आहे. या संस्थांना मोठ्या कंपन्यांमधून मिळणारा निधी कोरोना काळात बंद झाला आहे. निधीच्या तुटवड्यामुळे त्याचा परिणाम खेळाडू, पोषण आणि प्रशिक्षण यांच्यावरही झाला आहे.
हे ही वाचा:
विराट कोहलीने केले होते रोहित शर्माला डावलण्याचे प्रयत्न
धक्कादायक: दहा डीसीपींकडून गोळा केले ४० कोटी रुपये
तिरुपती देवस्थान समितीवर मिलिंद नार्वेकर कसे चालतात?
मूळची सातारा जिल्ह्यातील १६ वर्षीय विद्यार्थिनी सध्या मुंबईत कुटुंबासोबत राहत असून तिला बॅडमिंटनपटू बनायचे आहे. स्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेच्या मदतीने ती गेल्या तीन वर्षांपासून मेहनत घेत आहे. कोरोना महामारीपूर्वी तिचे वडील डबे पोहोचविण्याचे काम करत असत. मात्र, ती नोकरी गेल्याने ते आता सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. घरची परिस्थिती बेताची असल्याने ही विद्यार्थिनीही स्वतः भाजी चिरण्याच्या कामाला जाते. संस्था तिच्या आहाराचा खर्च करत असल्याने खेळासाठी लागणारी आवश्यक शारीरिक क्षमता निर्माण झाली होती. मात्र, सध्या हा आहारच मिळत नसल्याने आणि कुटुंबाचा खर्च कसाबसा चालत असल्याने त्याचा परिणाम शारीरिक क्षमतांवरही झाल्याचे विद्यार्थिनीने सांगितले.
वडाळा परिसरात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचीही अशीच परिस्थिती आहे. त्याच्या वडिलांची नोकरी गेल्यामुळे सध्या तो फळांची विक्री करतो. मागील सहा महिन्यांपासून त्याचा सराव बंद झाला आहे. सध्या त्याचे १८ वर्षांखालील मुलांच्या गटात खेळण्याचे स्वप्न आहे. मात्र, सरावा अभावी आणि संस्थेच्या मदती अभावी ते शक्य नसल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. सरकारने या मुलांसाठी कमीतकमी कागदपत्रांच्या आधारे शिष्यवृत्ती द्यावी. तसेच यांना सराव करता यावा यासाठी नजीकच्या परिसरात जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी क्राय संस्थेच्या विकास सहाय्य विभागाचे व्यवस्थापक कुमार निलेंदू यांनी केली आहे.