अब्जाधीश एलॉन मस्कच्या नेतृत्वाखालील टेस्ला कंपनीने भारतातील प्रस्तावित दोन ते तीन अब्ज अमेरिकी डॉलर किमतीच्या इलेक्ट्रिक गाडीचा प्रकल्प उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू केला आहे. बुधवारी ब्रिटनच्या ‘फायनान्शियल टाइम्स’ने या संदर्भातील वृत्त दिले आहे. या कंपनीचे प्रतिनिधी एप्रिलच्या उत्तरार्धात भारतात जागांची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. ज्या राज्यांमध्ये आधीच ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरिंग हब आहेत तसेच, निर्यात सुलभ करण्यासाठी बंदरे आहेत, अशी महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू ही राज्ये कंपनीच्या उच्च प्राधान्यावर आहेत.
त्यानंतर टेस्ला कंपनी कॅलिफोर्निया, टेक्सास, बर्लिन आणि शांघाय येथील त्यांच्या प्रकल्पांमधील ‘गिगाफॅक्टरी’ मॉडेलचे अनुकरण करून स्वतःचा बॅटरी प्रकल्प उभारण्याचा विचार करू शकते. या प्रकल्पामध्ये मुख्य प्रकल्पाच्या बाजूला किंवा जवळ दुकान थाटण्यात आले आहे, असे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत टेस्लाच्या विक्रीत तीव्र घट नोंदवली आहे. अमेरिका आणि चीन या प्रमुख बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रॉनिक गाड्यांची मागणी घसरली आहे.भारत सरकारने मार्चमध्ये किमान ५० कोटी अमेरिकी डॉलर (रु. ४, १५० कोटी) गुंतवण्याचे आणि तीन वर्षांत देशात व्यावसायिक उत्पादन सुरू करण्याचे वचन देणाऱ्या वाहनकंपन्यांना त्यांच्या काही इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात कर कमी केला होता. ‘टेस्ला’चे सीईओ एलॉन मस्क गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेवर लक्ष ठेवत आहेत, परंतु केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक गाड्यांच्या उत्पादक कंपनीला त्यांनी स्थानिक उत्पादन करावे, यासाठी वचनबद्ध केले आहे.
हे ही वाचा:
‘मिस युनिव्हर्स २०२४’ स्पर्धेत सहभागी होण्याच्या सौदी अरेबियातील मॉडेलच्या दाव्याबाबत संभ्रम
“आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला भक्कम बनविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात पाया रचला”
‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे काँग्रेसने थकवले
गेल्या वर्षी जूनमध्ये, मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि दोघांनी भारतातील गुंतवणुकीच्या संधींसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली होती.भारतामध्ये २४ हजार अमेरिकी डॉलर किमतीचे इलेक्ट्रिक वाहन तयार करण्यासाठी कारखाना बांधण्यात स्वारस्य असल्याचे मस्क यांनी म्हटले होते. तसेच, भारतामध्ये विकू इच्छित असलेल्या अधिक महाग मॉडेल्सवर कमी कर लावण्याची मागणी केली होती.
भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांची बाजारपेठ लहान असली तरी वाढीच्या मार्गावर आहे. सध्या देशांतर्गत टाटा मोटर्सचे वर्चस्व आहे. सन २०२३मध्ये भारतातील एकूण गाड्यांच्या विक्रीमध्ये इलेक्ट्रॉनिक गाड्यांचा वाटा अंदाजे दोन टक्के होता. सन २०३०पर्यंत हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.