पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपल्या उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदार संघाचा दौरा केला. जागतिक क्षय दिनाच्या निमित्त टीबीमुक्त पंचायतीसह विविध उपक्रमांचा शुभारंभ वाराणसीमध्ये केला. ‘वन वर्ल्ड टीबी समिट’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. क्षयरोगाशी लढण्यासाठी देशाने नव्या विचाराने काम केले आहे. क्षयरोगाचा अंत करण्याचे जागतिक उद्दिष्ट २०३० हे आहे, परंतु भारत २०२५ पर्यंत क्षयरोग संपवण्याचा निर्धार पंतप्रधानांनी यावेळी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कळ दाबून राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या वाराणसी शाखेचे उद्घाटन केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही या शिखर परिषदेला उपस्थित होते. परिषदेत मार्गदर्शन करताना मोदी पुढे म्हणाले, काशी येथे ‘वन वर्ल्ड टीबी समिट’ होत आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. सुदैवाने मी काशीचा खासदारही आहे. काशी शहर ही शाश्वत भूमी आहे जी हजारो वर्षांपासून मानवतेच्या प्रयत्नांची आणि परिश्रमाची साक्षीदार आहे.
भारत टीबीमुक्त होण्यासाठी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे आणि आता देशात टीबी रुग्णांची संख्या कमी होत आहे. क्षयरुग्णांमध्ये जागृतीचा अभाव आहे, त्यामुळे या रुग्णांना अधिकाधिक जागरूक करण्याची गरज पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. भारताने २०१४ पासून क्षयरोगाच्या विरोधात ज्या नवीन विचारसरणीने आणि दृष्टिकोनाने काम करण्यास सुरुवात केली ती खरोखरच अभूतपूर्व आहे. भारताच्या या प्रयत्नांची संपूर्ण जगाला माहिती असली पाहिजे कारण टीबीविरुद्धच्या जागतिक लढ्यात हे एक नवे मॉडेल आहे याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले.
हे ही वाचा:
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली; दोन वर्षांच्या शिक्षेमुळे कारवाई
‘पंतप्रधानांचा अपमान देशातील जनता सहन करणार नाही’
जाणून घ्या आजच्या ‘मत्स्य जयंतीबद्दल’
पासपोर्ट मिळाला नाही..अमृतपाल परदेशात पलायन करणार ?
आज क्षयरोगावरील उपचारासाठी ८०% औषधे फक्त भारतातच बनवली जात आहेत. भारतात टीबी रुग्णांची संख्या कमी होत आहे. कर्नाटक आणि जम्मू-काश्मीरला टीबी मुक्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लोकांनी हे यश मिळवले आहे त्यांचे मी अभिनंदन करतो असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.