महाराष्ट्रात पुन्हा एकदा एल्गार परिषदेचे आयोजित करण्यात आले आहे. ३० जानेवारी रोजी पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात ही परिषद होणार आहे. या परिषदेला पोलिसांनी परवानगी दिल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे.
सध्या एल्गार परिषदेचा प्रचार गावोगावी सुरु असून शाहिरी जलसा, चौकसभा यांच्या माध्यमातून ३० जानेवारी रोजी नागरिकांनी एल्गार परिषदेला उपस्थित राहावे यासाठी आवाहन केले जात आहे. यावर्षीही एल्गार परिषदेला देशातील निरनिराळ्या भागातून अनेक वक्ते येणार असल्याचे सांगितले जात आहे. यात स्वतंत्र काश्मीरच्या मागणीचे समर्थन करणाऱ्या लेखिका अरुंधती रॉय, वादग्रस्त पोलीस अधिकारी संजीव भट्ट यांची पत्नी श्वेता भट्ट आणि कन्या आकाशी भट्ट, दिल्ली दंगलीच्या आरोपात अटकेत असलेल्या उमर खालिदचे वडील एस.क्यू.आर.इलियास, जामिया आंदोलनातील आयशा रेन्ना, पायल तडवी हिची आई अबेदा तडवी यांच्या समवेत इतर अनेक वक्ते असणार आहेत.
या आधी २०१७ साली एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील शनिवार वाड्याच्या बाहेर झालेल्या या परिषदेत निवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील, निवृत्त न्यायाधीश पी.बी.सावंत, जिग्नेश मेवाणी, प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक वक्ते सहभागी झाले होते. या परिषदेतल्या भाषणांमुळे ही परिषद चांगलीच चर्चेत राहिली होती. याच परिषदेच्या नंतर कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभावर दंगल देखील झाली होती. त्यामुळे देखील या परिषदेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.