मध्य प्रदेशमधील उमरिया तालुक्यातील बांधवगडमधील हत्तींना त्यांच्या नेहमीच्या व्यग्र दिनक्रमातून रजा देण्यात आली आहे.
येथील व्याघ्र प्रकल्पात ‘गज महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात हत्तींना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ देऊन त्यांचे लाड करण्यात येणार आहेत. बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील ताला येथे शनिवारी गज महोत्सव सुरू झाला. येत्या १० सप्टेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. या महोत्सवात १४ हत्तींचा समावेश आहे.
या महोत्सवात हत्तींना आंघोळ घालून त्यांचे मसाज करून त्यांना सजवण्यात येईल. चंदनाची पावडर लावून हत्तींना त्यांचे आवडीचे पदार्थ खाऊ घातले जातील. विशेष आरोग्य अधिकाऱ्यांकडून त्यांच्या आरोग्याची तपासणीही केली जाणार आहे. महोत्सवादरम्यान हत्तींना संपूर्ण दिवस विश्रांती देण्यात येईल. पर्यावरणासाठी प्राणीही इतर गोष्टींबरोबर तितकेच महत्त्वाचे आहेत, हा संदेश या गज महोत्सवातून देण्यात दिला जाईल. हत्तींना नेहमीच्या कष्टप्रद जीवनातून काहीसा आराम देण्याचा या प्रकल्पाचा हेतू आहे, असे उपविभागीय अधिकारी श्रद्धा पेंद्रे म्हणाल्या.
हे ही वाचा:
शिवमंदिरात जाताना बांधकाम व्यावसायिकाला मारले ठार
जिओ धन धना धन! आणणार सगळ्यात स्वस्त स्मार्ट फोन
कोस्टल रोड ठरतोय ‘कॉस्टली’; शेलारांकडून घोटाळ्याचा आरोप
मोदी एक्स्प्रेसमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा गजर
बांधवगड गज महोत्सवात अनेक लोकही उपस्थित राहत आहेत. महोत्सवात येणारे लोक हे हत्तींसाठी फळ आणत असून स्वतःच्या हाताने हत्तींना खाऊ घालत आहेत. हत्तींसोबत फोटो काढण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. लोक फळांसोबतच हत्तीला गूळही खाऊ घालत आहेत. दिवसाला १० ते १५ नारळ, ५ किलो सफरचंद, ५ डझन केळी आणि २ किलो गूळ असा हत्तीचा रोजचा आहार असतो.