भारताला स्वयंपूर्ण करण्याचा सरकारचा इरादा आहे. कोरोना महामारीमुळे जगाच्या चीनकडे बघण्यच्या बदललेल्या दृष्टीकोनाचा फायदा भारत घेत आहे. चीनला सशक्त पर्याय, उत्पादनाचे मोठे केंद्र या रुपाने भारत जगापुढे येत आहे.
हे ही वाचा: बॅटरीच्या प्रांतात भारत होणार आत्मनिर्भर
या पार्श्वभूमीवर, केवळ इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे उत्पादन भारतीय अर्थव्यवस्थेत १ ट्रिलीयन डॉलरची भर घालू शकते असे नुकतेच माहिती व तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्रालयाचे केंद्रिय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. यामुळे २०२५ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलरची करण्याच्या मोदी सरकारच्या ध्येयाकडे एक दमदार पाऊल पडेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘असोचॅम फाऊंडेशन’च्या पार पडलेल्या आभासी बैठकीत ते बोलत होते. “माझी भविष्यातली योजना स्पष्ट आहे. मी केवळ मोबाईल फोनच्या उत्पादनावर थांबू इच्छित नाही. २०२५ पर्यंत आपण १ बिलीयन मोबाईल ५० मिलीयन टीव्ही आणि ५० मिलीयन लॅपटॉप आणि टॅब्लेटचे उत्पादन चालू करू.” त्यामुळे ५ ट्रिलीयन अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना “केवळ इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या उत्पादनातून अर्थव्यवस्थेत १ ट्रिलीयन डॉलरची भर पडेल याबद्दल मला कोणतीही शंका नाही.” असेही रविशंकर प्रसाद म्हणाल्याचे द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार समजते.
याच वृत्तानुसार २०१४ पासून भारतातील एकूण मोबाईल उत्पादकांची संख्या दोनापासून वाढून २५० झाली आहे. एकट्या नोएडा भागात ९०पेक्षा अधिक मोबाईल उत्पादक आहेत. त्यामुळे देशभरात सुमारे सहा लक्ष रोजगारांची निर्मीती झाली.