छत्तीसगढमधील माओवादीग्रस्त सुकमा जिल्ह्यातील एल्मागुंडा गावात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ७६ वर्षांनी वीज आली आहे. अवघ्या ५०० लोकवस्तीचे एल्मागुंडा गाव तेलंगणा राज्य आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेनजीक आहे. माओवाद्यांची या भागावर पकड असल्यामुळे या गावात वीज येणे ही बाब महत्त्वाची मानली जात आहे. आतापर्यंत या गावाची केवळ सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशावरच भिस्त होती.
‘एल्मागुंडा गावात नक्षलग्रस्तांचा प्रभाव असल्याने एल्मागुंडा गावात विजेची तरतूद आतापर्यंत करणे शक्य झाले नव्हते,’ असे बस्तर विभागाचे पोलिस महासंचालक पी. सुंदराज यांनी सांगितले. छत्तीसगढ राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जिल्हा पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल या सर्वांनी मिळून हा विद्युतीकरणाचा प्रकल्प तडीस नेला.
हे ही वाचा:
वृत्तवाहिन्यांच्या ‘बेताल’ बातम्यांमुळे तपासावर परिणाम
पुण्यातील गुप्त भेटीवर अजित पवार काय म्हणाले?
मेरे प्यारे परिवारजन… म्हणत पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाचा लेखाजोगा मांडला
चीन-पाकिस्तानवर नजर ठेवणार भारताचे हेरॉन मार्क २ ड्रोन
सहा महिन्यांपूर्वी सुरक्षा दलाने या नक्षलग्रस्त भागात पोलिस तळ उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या गावांत वीज आणण्याच्या प्रकल्पाला चालना मिळाली. ‘पोलिसांचा तळ उभारल्यानंतर आम्ही सातत्याने गावकऱ्यांशी संवाद साधत होतो. त्यामध्ये एल्मागुंडा गावकऱ्यांचाही समावेश होता. त्यांना नक्षलवाद्यांच्या कारवायांबाबत माहिती द्यावी, त्यांनी गावाच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा आणि विविध विकासकामांमध्ये सहकार्य द्यावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले गेले,’ अशी माहिती सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून एल्मागुंडा, तोंडामार्का आणि बेड्रे यांसह अनेक नक्षलग्रस्त भागांत पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे तळ उभारले जात आहेत. हे तळ केवळ स्थानिक भागात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करीत नसून रस्ते, वीज, आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा आदी महत्त्वाच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठीही ते महत्त्वाचे योगदान देत आहेत. या परिश्रमाचे फलित एल्मागुंडा गावात दिसून आले आहे. म्हणूनच ७७वा स्वातंत्र्यदिनाची पहाट उजाडण्याआधीच या गावकऱ्यांच्या घरोघरी ‘सूर्योदय’ झाला आहे. एल्मागुंडा येथील वीज जणू भविष्यातील प्रगतीचे द्योतक आहे.