राज्य सरकारने बळीराजासाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय घेत सर्व शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचे वीज बिल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ‘मागेल त्या शेतकऱ्याला सौरपंप’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषीवाहिन्यांचे पंप विलगीकरण आणि सौर ऊर्जीकरण करण्याचा १५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी ‘मागेल त्याला सौरऊर्जा पंप’ या योजनेअंतर्गत एकूण ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे.
पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आगामी वर्षांचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत तर काही योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. यापुढे राज्यात पीकांचे नुकसान झाल्यास ई- पंचनामा प्रणालीद्वारे त्याचे पंचनामे करण्यात येणार आहेत. याचबरोबर अजित पवार यांनी राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दुध उत्पादक शेतकरी अडचणीत आल्यामुळे त्यासाठी अर्थमंत्र्यांनी दूध उत्पादकांना पाच रूपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील ग्रामीण भागात पीक साठवणुकीसाठी सोयी सुविधा नसल्याने शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीवेळी मोठे नुकसान होते. यावर उपाय म्हणून ‘गाव तिथे गोदाम’ हा प्रकल्प उभारला जाणार आहे. सरकारने एक रूपयांत पीक वीमा योजना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
पुण्याहून बसचा पाठलाग करून दादरमध्ये लूट करणाऱ्या कोयता गॅंगचे सदस्य पकडले
‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’तून वर्षाला मिळणार तीन गॅस सिलिंडर मोफत
टीएमसी खासदारांना राज्यसभा अध्यक्षांनी फटकारले
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यासाठी नुकसान भरपाईत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास द्यावयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेत २० लाख रुपयांवरून २५ लाख रुपये, त्यात कायमचे अपंगत्व आल्यास ५ लाख रुपयांवरून ७ लाख ५० हजार रुपये, गंभीर जखमी झाल्यास भरपाई १ लाख २५ हजारावरून ५ लाख रुपये, किरकोळ जखमी झाल्यास २० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. शेती पिकाच्या नुकसान भरपाईकरिता देय रकमेच्या कमाल मर्यादेतही २५ हजार रुपयांवरून ५० हजार रुपये वाढ करण्यात आली आहे.