नवी मुंबई महानगरपालिका परिवहनच्या ( एनएमएमटी) सुमारे तीनशे बस नवी मुंबई, मुंबई, कल्याण- डोंबिवली आणि ठाणे परिसरात चालवल्या जातात. या तीनशे बसपैकी ५० बस या इलेक्ट्रिक आहेत.
डिझेलवर चालणाऱ्या बसेसच्या खर्चाच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसचा खर्च कमी असल्याने एनएमएमटीचा तोटा कमी झाला आहे. त्याचबरोबर प्रदूषणातही घट झाली आहे. इलेक्ट्रिक बस या एका महिन्यात सुमारे तीन लाख किलोमीटर धावतात. याच बस डिझेलवर धावल्या असत्या तर त्यांना सुमारे एक लाख लिटर डिझेल लागले असते.
एक लिटर डिझेलमध्ये बस फक्त तीन किलोमीटर धावते, तर वोल्वो बस दोन किलोमीटर धावते. एनएमएमटीमधील इलेक्ट्रिक बस एका महिन्यात कमीत कमी सहा हजार किलोमीटर धावते. ५० बसेस सुमारे तीन लाख किलोमीटर धावतात. म्हणजेच हे अंतर डिझेलवर चालणाऱ्या बसेसने पार केले असता त्यांना सुमारे एक लाख लिटर डिझेल लागले असते. या डिझेलचा खर्च सुमारे एक कोटी इतका झाला असता. इलेक्ट्रिक बसेसमुळे या खर्चात कपात होऊन एनएमएमटीचा तोटा कमी झाला आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेचा सत्ताग्रह! ठाणे महापालिकेत गांधींचा विसर
‘आगामी सरकार बनविण्यासाठी नव्हे; तर देश घडविण्यासाठी सरकार चालवले पाहिजे’
लालबहादूर शास्त्री एक सालस राजकारणी
शहरांमधील कचऱ्याचे डोंगर नष्ट करणार
सध्या एनएमएमटीच्या ताफ्यात ५० इलेक्ट्रिक बसेस आहेत त्यात अजून १३० इलेक्ट्रिक बसेसची भर पडणार आहे. त्यातील काही बस सेवेसाठी उपलब्ध झाल्या असून त्यांच्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यापुढे सीएनजी आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बसेसवर अधिक भर दिला जाणार असून खर्च कमी करण्यावर एनएमएमटीने भर दिला आहे, असे एनएमएमटीचे महाव्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी सांगितले.
बेस्टच्या वातानुकूलित बसचा तिकीट दर हा एनएमएमटीच्या वातानुकूलित बसच्या तिकीट दरापेक्षा कमी असल्याने प्रवासी बेस्टला प्राधान्य देतात. तिकीट दर कमी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असून परिवहन विभागाच्या मंजुरीनंतर हा सुधारित तिकीट दर लागू करण्यात येणार आहे.