शिवसेना कोणाची शिवसेना शिंदे गटाची की उद्धव ठाकरे गटाची याचा निर्णय वारंवार लांबणीवर पडत आहे. चिन्हाच्या संदर्भात मंगळवारी सुनावणी होणार होती परंतु ती झाली नाही. आता यावर केंद्रीय निवडणूक आयोगात १२ डिसेंबरला सुनावणी होणार आहे . निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही पक्षांना ९ डिसेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित विधाने/कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांचे वकील निवडणूक आयोगासमोर या दिवशी युक्तिवाद करतील.
शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर शिवसेना पक्षावर दावा कोणाचा हा प्रश्न निर्माण झाला होता. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाने शिवसेना आमचीच असा दावा केला होता. त्यानंतर आमदार पात्रता आणि पक्षाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाला दिलाय होत्या.
हे ही वाचा :
सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक
नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका
शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार
राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब
निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या आधी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवलं होतं. त्यानंतर दोन्ही गटांना वेगवेगळी नावे आणि चिन्ह देण्यात आली होती. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं त्यावेळी निवडणूक आयोगाने या दोन्ही गटांना शिवसेना पक्षावर दावा सांगण्यासाठी पुरावे म्हणून सर्व कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली होती. ही मुदत २३ नोव्हेंबरला संपली. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाकडून महत्त्वाचे पुरावे निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले होते.