मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांवर झालेली भक्कम युती आहे!

जाहिरातींवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला दिले चोख उत्तर

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांवर झालेली भक्कम युती आहे!

शिवसेनेने विविध वर्तमानपत्रांना दिलेल्या जाहिरातींवरून मंगळवारी चर्चेला उधाण आले होते. या जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या लोकप्रियतेची टक्केवारी जास्त असल्याचे म्हटले होते. त्यामुळे विरोधकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी भाजपा शिवसेना युतीत सगळे काही आलबेल नाही. फडणवीसांची खुर्ची एकनाथ शिंदे घेणार अशा प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र त्यावर चोख उत्तर देत विरोधकांना स्पष्ट शब्दांत ही युती भक्कम असल्याचे सांगितले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भाजपा शिवसेना युती एक वैचारिक युती आहे. ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित अशी युती आहे. स्वार्थासाठी खुर्चीसाठी, सत्तेसाठी मला काहीतरी मिळेल यासाठी झालेली युती नाही. महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांच्या मनातली युती आहे. म्हणून ही युती भक्कम आहे. ही शिवसेना भाजपा महायुती येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य निवडणूका पूर्ण ताकदीने लढेल. आणि ताकदीने विकासाच्या मुद्द्यावर जिंकेल असा मी विश्वास व्यक्त करतो.

हे ही वाचा:

‘बिपरजॉय’मुळे ६७ रेल्वे गाड्या रद्द!

आनंद महिंद्रांनी नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

जी- २० परिषदेसाठी आलेले परदेशी पाहुणे वारीत दंग

 

या जाहिरातीत पंतप्रधानांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे, त्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले की, पतंप्रधानांना अख्ख्या जगाने पसंती दिली आहे. ते जगात नंबर वन आहेत. मोठ्या देशांची अर्थव्यवस्थाही डगमगलेली असताना नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली आहे. म्हणून ते नंबर वन आहेत. त्यांच्या नेतृत्वाचा राज्यासाठीही फायदा झाला आहे. डबल इंजीन सरकारमुळे राज्याचे हित झाले आहे. त्याबद्दल पंतप्रधानांचे आभिनंदन करतो.

मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत झालेल्या काही निर्णयांबाबतही सांगितले. ते म्हणाले की,

या सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन हेक्टरची मर्यादा वाढवून ती तीन हेक्टरसाठी ही मदत दिली जाईल. मविआ सरकारने ५० हजारापर्यंतच कर्जफेड करणाऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता अंमलबजावणी केली नव्हती. सततच्या पावसामुळे होणारे नुकसान देय नव्हते. पण सरकारने हे नुकसान नैसर्गिक आपत्ती ठरवून त्यांना मदत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यासाठी १५०० कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे हे सरकार आहे.

Exit mobile version