गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे आता मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार अशा प्रकारच्या बातम्यांचे पीक आले होते. त्या अफवांग्या फुग्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाचणी लावली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील असे ठाम आणि स्पष्ट विधान त्यांनी पत्रकार परिषदेत करत या अफवांचे उडवले जाणारे पतंग कापले जातील असे सुनावले.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री व्हायला हवेत असे कुणालाही वाटू शकते. राष्ट्रवादीला अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटू शकते. भाजपाच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटू शकते. तर आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. पण मी आज अगदी अधिकृतपणे या महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो. या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील दुसरा कुणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्रीपदात कोणताही बदल होणार नाही.
यासंदर्भात अजित पवार यांच्याशी संपूर्ण स्पष्टता असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, या संदर्भात अजित पवार आणि मी आमच्या दोघांत पूर्ण स्पष्टता आहे. ज्यावेळी महायुतीची चर्चा झाली तेव्हाही अजित पवार यांना स्पष्टपणे याची कल्पना दिली आणि त्यांनी स्वीकारली. केवळ स्वीकारलीच नाही तर आपल्या वक्तव्यातही त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री बदलाची चर्चा नाही. करण्याचे कारण नाही.
हे ही वाचा:
दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनाने सुरू होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा
चांदेरे फौडेशन, राजमाता जिजाऊ संघ सतेज करंडकाचे मानकरी
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड
फडणवीस यांनी महायुतीतील काही नेत्यांनाही सुनावले. ते म्हणाले की, आमच्या महायुतीतील लोक जे अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत. त्यांना माझे स्पष्टपणे सांगणे आहे की, अशाप्रकारचे संकेत देणे किंवा गोंधळ निर्माण करणे तात्काळ थांबवले पाहिजे. कारण यातून महायुतीत संभ्रम तयार होतो. नेत्यांच्या मनात संभ्रम नाहीत शिंदेच मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संभ्रम ठेवण्याचे कारण नाही.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १०-११ ऑगस्टनंतर १६ आमदार अपात्र होतील असे विधान केले होते त्याचाही समाचार फडणवीस यांनी घेतला. ते म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण जे बोलले तशा प्रकारची पतंगबाजी अनेक लोक करत आहेत. अनेक लोक राजकीय भविष्यवेत्ते झालेले आहेत. तरीही भविष्य सांगून युतीत किंवा जनतेत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तरी मी अधिकृतपणे सांगतो की १०, ११ आणि ९ तारखेलाही काहीच होणार नाही. झालेच तर विस्तार होईल. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबद्दल ठरवतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील.