यजमान पाकिस्तानच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५साठी पात्र ठरणारे सर्व आठ संघ कोण आहेत, हे अखेर भारत विरुद्ध नेदरलँड्स विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर स्पष्ट झाले. या स्पर्धेसाठी पाकिस्तानसह, भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेश हे संघ पात्र ठरले आहेत. तर, श्रीलंका आणि नेदरलँड्सचे संघ या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहीत.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५साठी पात्र ठरणाऱ्या संघांचा निर्णय विश्वचषक स्पर्धेतील गुणतक्त्यावरून ठरेल, असे आयसीसीने जाहीर केले होते. यजमान पाकिस्तानशिवाय उर्वरित सात संघांची निवड या गुणतक्त्यावरून केली जाणार होती.
१९९६चे विश्वविजेते ठरलेल्या श्रीलंकेच्या संघाची कामगिरी या स्पर्धेत अतिशय वाईट झाली. खेळाडूंच्या दुखापतींनी त्रस्त असलेल्या श्रीलंकेच्या संघाने या संपूर्ण स्पर्धेत नऊ सामन्यांपैकी केवळ दोन सामनेच जिंकले. त्यातील एक विजय त्यांनी नेदरलँडवर तर दुसरा इंग्लंडवर मिळवला. शिवाय, उर्वरित सात सामने त्यांनी मोठ्या फरकाने हरले. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेच्या गुणतक्त्यात हा संघ चार गुणांसह नवव्या क्रमांकावर राहिला.
हे ही वाचा..
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या स्थानकाचाही कायापालट
उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!
संयुक्त राष्ट्रांत पहिल्यांदाच भारताचे इस्रायलविरोधात मत!
आयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरलेल्या बांगलादेश संघाच्या खात्यातही चार गुण होते. मात्र त्यांची धावगती श्रीलंकेपेक्षा जास्त होती. तर, दुसरीकडे नेदरलँड्सने विश्वचषक २०२३मध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. या संघाने दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाला चित केले. तर, त्यांनी बांगलादेशसारख्या संघालाही हरवले. धावगती अपेक्षेइतकी नसल्याने तेही या स्पर्धेत पात्र ठरू शकले नाहीत. बांगलादेशची धावगती -१.०८७ होती तर, श्रीलंका आणि नेदरलँड्सची धावगती अनुक्रमे -१.४१९ आणि -१.८२५ होती.