युरो २०२० चा दुसरा सामना खेळला गेला तो स्वित्झर्लंड आणि वेल्स यांच्यामध्ये. स्वित्झर्लंड विरुद्ध वेल्स हा सामना अनिर्णीत राहिलेला असला तरी या सामन्याचे वैशिष्ठ्य ठरले ते म्हणजे स्वित्झर्लंडचा २४ वर्षीय ब्रिल एम्बोलो. सामन्याच्या ४९ व्या मिनिटात त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय गोल केला ते पण आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात.
सामन्याचा पहिला हाफ स्वित्झर्लंडचा अटॅक विरुद्ध वेल्सचा डिफेन्स असा राहिला. वेल्स कडून गॅरथ बेल आणि मुर या दोघांनी वेल्सच्या आक्रमणाची सूत्रे सांभाळली परंतु त्यांना म्हणावं तसं यश आलं नाही. पहिल्या हाफ मधे स्वित्झर्लंडकडून झेर्डेन शकिरी, सेफेरोवीच आणि एम्बोलो यांनी आक्रमण केले. आणि वेल्सचा बचाव भेदण्यात त्यांना यश येत होतं पण वेल्सचा गोलकीपर डॅनी वार्ड यांनी स्वित्झर्लंडचे प्रयत्न व्यर्थ ठरवले.
पहिल्या हाफ मधे स्वित्झर्लंडचे वर्चस्व एवढं होतं की स्वित्झर्लंडकडे ७३% तर वेल्स कडे केवळ २७% चेंडूचा ताबा होता. आणि त्याचे फलित सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये बघायला मिळाले. स्वित्झर्लंडकडून आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा ब्रील एम्बोलो याने गोल करून स्वित्झर्लंडला ०-१ अशी बढत मिळवून दिली. पण स्वित्झर्लंडला ही बढत फार काळ टिकवता आली नाही. ७४व्या मिनिटात वेल्सच्या कैफर मूर याने सामना १-१ अश्या बरोबरीत आणला. ६ फूट ४ इंच उंच असणारा मूर, आपल्या उंचीचा फायदा घेत सुंदर हेडर करत वेल्सला गोल करून दिला.
हे दोन देश आंतररष्ट्रीय फुटबॉलमधे याआधी एकूण ७ वेळा समोर आलेले आहेत आणि सातही सामने अनिर्णीत राहिले आहेत आणि आज आठव्यांदाही हा सामना अनिर्णीत राहिला. दोन्ही संघाना आता १-१ गुण मिळालेला आहे.