जागतिक महिला दिनी महिला पोलीस अंमलदारांना मिळाली मोठी ‘भेट’

जागतिक महिला दिनी महिला पोलीस अंमलदारांना मिळाली मोठी ‘भेट’

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी जागतिक महिला दिनी महिला पोलीस अंमलदारांना आठ तास ड्युटीची भेट देऊन खुश केले आहे. आठ तास ड्युटीमुळे महिला पोलीस अंमलदार (शिपाई, नाईक, हवालदार) यांना आपल्या कुटुंबियांना यापुढे वेळ देता येणार असल्यामुळे महिला पोलीस अंमलदारामध्ये आनंदाचे वातावरण आहे. आठ तास ड्युटीची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश पोलीस आयुक्त यांनी मुंबईतील पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरिक्षक यांना दिले आहे.

मुंबई पोलीस दलात काम करणारे बहुतांश पोलीस अंमलदार हे मुंबईच्या बाहेरून कामावर येत असल्यामुळे त्यांचा अनेक तास प्रवासात खर्च होतात. त्यात १२ तास ड्युटी केल्यानंतर प्रवासात दीड ते दोन तास खर्च होत असल्यामुळे त्यांना कुटुंबाना देण्यास वेळ मिळत नाही, त्यात महिला अमलदारांची अधिकच पंचाईत होत होती.

आठ तास ड्युटी करण्याबाबत अनेक प्रस्ताव पाठविण्यात आले होते. प्रायोगिक तत्वावर आठ तास ड्युटी करण्यात देखील आली होती. मात्र मनुष्यबळ अभावी हे शक्य होत नसल्यामुळे पुन्हा पोलीस अंमलदार यांची ड्युटी पूर्ववत करण्यात आली त्यामुळे पोलीस अंमलदार विशेष करून महिला अंमलदार यांच्यात नाराजी दिसून येत होती.

अखेरीस पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई पोलीस दलातील महिला अंमलदार यांना महिला दिनी भेट म्हणून आठ तासांची ड्युटी देण्याची घोषणा करण्यात आली. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्तांनी सोमवारी काढले असून मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना हे लेखी आदेश पाठविण्यात आले असून लवकरात लवकर या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी असे म्हटले आहे.

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आपल्या लेखी आदेशात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आठ तास ड्युटी करण्याबाबत दोन पर्याय दिले असून या दोन पर्याय पैकी एक पर्याय निवडून त्याप्रमाणे महिला अंमलदार यांना ड्युटीचे वाटप करण्यात यावे असे म्हटले आहे. महिला पोलीस अमलदार हे दोन शिफ्टमध्ये काम करतात मात्र आठ तास ड्युटी झाल्यानंतर त्यांना तीन शिफ्ट मध्ये काम करावे लागणार आहे.

हे ही वाचा:

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी काय बोलले नरेंद्र मोदी

रशिया युक्रेन युद्धामुळे भारतीय रुपया घसरला!

आज पंतप्रधान मोदींनी केली युक्रेनच्या अध्यक्षांशी चर्चा

‘शरद पवार मानाची अपेक्षा ठेवतात, तर दुसरीकडे बगल में छुरी घेऊन फिरतात’

 

या शिफ्ट अशा असतील

पर्याय – क्र.१ ) सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पहिली शिफ्ट दुपारी ३ ते रात्री १० पर्यत दुसरी शिफ्ट आणि रात्री १० ते सकाळी ८ पर्यत तिसऱ्या शिफ्ट असणार आहे.
पर्याय – क्र. २) सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पहिली शिफ्ट दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट आणि रात्री ११ते सकाळी ७ वाजेपर्यंत तिसरी शिफ्ट
या दोन्ही पर्याय पैकी एक पर्याय पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी निवडून ड्युटीचे वाटप करावे असे आदेशात म्हटले आहे.

Exit mobile version