महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटविणारे आणि गेली ५० वर्षे पत्रकारितेत सक्रीय असलेले ज्येष्ठ संपादक दिनकर रायकर यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सध्या ते लोकमत वृत्तपत्र समूहात समन्वय संपादक म्हणून कार्यरत होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर डेंग्यु आणि कोरोनावरील उपचार सुरु होते.
उपचारानंतर ते डेंग्युतून बरे झाले होते, मात्र फुप्फुसांचा संसर्ग कायम होता. नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती. त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. शुक्रवारी पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आणि त्यातच पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अल्पशिक्षित असलेले रायकर नागपूर येथील एका इंग्रजी दैनिकात चपराशी म्हणून कामाला लागले. टेलिप्रिंटरच्या तारा फाडून संपादकांकडे देण्याचे काम त्यांच्याकडे होते. नंतर इंडियन एक्स्प्रेसमध्ये त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. मुंबईत त्यांचे घर नव्हते. त्यामुळे इंडियन एक्स्प्रेसमध्येच त्यांनी आपले बिऱ्हाड थाटले. तिथेच ते डीटीपी ऑपरेटर, रिपोर्टर ते डेप्युटी एडिटर अशी त्यांनी वाटचाल केली. लोकसत्तातून निवृत्त झाल्यावर ते लोकमतमध्ये संपादक म्हणून कार्यरत होते.
हे ही वाचा:
स्वतःच्या सुनेला अधिकार न देणारे तौकीर महिलांना काय न्याय देणार?
वडिलांच्या संपत्तीवर कोणाचा अधिकार जास्त? सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट
टी- २० वर्ल्डकप मध्ये भारत पाकिस्तान लढत होणार या दिवशी
परवीन बाबी : याद बाकी, बात बाकी
अत्यंत उत्साही, नेहमीच हसतमुख, आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देणारे, त्यांच्या पाठीशी उभे राहणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. जिथेही ते संपादक म्हणून गेले तिथे त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय राखला, त्या सगळ्यांशी त्यांचे मित्राप्रमाणेच संबंध होते. ते गमतीजमती करून वातावरण हलकेफुलके ठेवत.
त्यांना पुढारीकार ग गो जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटर इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.