पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा फरार नेता शाहजहां शेख याला ईडीने चौथे समन्स पाठवले आहे. बंगालमधील रेशन घोटाळ्याप्रकरणी २९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता कोलकात्यातील सीजीओ कॉम्प्लेक्स येथे चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश या नोटिशीत दिले आहेत.
पश्चिम बंगालच्या रेशन वितरण घोटाळ्यात सुमारे १० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा ईडीचा दावा आहे. या प्रकरणी ईडीने सर्वांत प्रथम बंगालचे माजी मंत्री ज्योतिप्रिय मल्लिक याला अटक केली होती. त्यानंतर तृणमूल नेता शाहजहां शेख आणि बनगाव नगरपालिकेचे माजी अध्यक्ष शंकर आद्या यांचा हातही यात आढळला होता. याच प्रकरणात ५ जानेवारी रोजी जेव्हा ईडीचे अधिकारी शाहजहां शेख याच्या घरी छापा मारण्यासाठी पोहोचले तेव्हा काही जणांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केली होती. स्थानिकांनी अधिकारी आणि त्यांच्यासोबतच्या निमलष्करी वाहनांना घेराव घातला होता. जमावाने अधिकाऱ्यांच्या गाडीची तोडफोडही केली होती. त्यात ईडीचे तीन अधिकारी जखमी झाले होते.
हे ही वाचा:
दाऊद इब्राहिमच्या भावाच्या मेहुण्याची उत्तर प्रदेशात हत्या!
युक्रेन-रशिया संघर्षापासून दूर राहा
‘राहुल गांधी यांना भेटण्यासाठी १० किलो वजन कमी करण्यास सांगितले गेले’!
संदेशखाली वादात शाहजहान शेखवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल!
या प्रकरणी बंगाल पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले होते. त्यातील एक गुन्हा स्थानिकांच्या तक्रारीनुसार दाखल करण्यात आला होता. ईडीचे अधिकारी परिसरात अशांतता निर्माण करत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. मात्र त्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणी दखल घेऊन ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांच्या चौकशीला ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली.
५ जानेवारीला झालेल्या हल्ल्यानंतर ईडीच्या पथकाने बोंनगाव नगरपालिकेचे माजी अध्यक्ष तृणमूलचे शंकर आद्या यांना अटक केली होती. आद्या आणि शाहजहां यांना माजी अन्नधान्य पुरवठा मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांचे निकटवर्तीय मानले जाते. आद्या यांनाही रेशनवितरण घोटाळ्यात आरोपी करण्यात आले आहे. याआधी केंद्रीय संस्थेने आद्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संबंधित मालमत्तेचा तपास केला होता.