५० कोटी रुपयांच्या कुत्र्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ईडीने बेंगळुरूचे रहिवासी एस सतीश यांची चौकशी सुरू केली. श्वानपालक सतीशने दावा केला होता की त्याने लंडनमधून ५० कोटी रुपयांना कॉकेशियन शेफर्ड कुत्रा खरेदी केला आहे. मात्र, या प्रकरणी गुरुवारी (१७ एप्रिल) ईडीने श्वानपालकाच्या घरावर छापा टाकताच भलतेच कारण समोर आले आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरूमधील जेपी नगर तिसरा फेज येथील कुत्रापालकाच्या घरावर छापे टाकण्यात आले. मात्र, पथकाला असा कोणताही कुत्रा सापडला नाही किंवा कुत्र्याच्या खरेदीबाबत असे कोणतेही कागदपत्र सापडले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, ती व्यक्ती इतका महागडा कुत्रा खरेदी करण्यास सक्षम नव्हती.
परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) अंतर्गत संभाव्य उल्लंघनाच्या अहवालांवर कारवाई करत, ईडीने ब्रीडरच्या घरावर शोध मोहीम राबवली, असे एका सूत्राने सांगितले. पण तिथे ‘कॅडाबोम्ब ओकामी’ नावाचा कोणताही परदेशी कुत्रा आढळला नाही. कुत्रा आणि त्याबाबत कोणतेही खरेदीचे कागदपत्र सापडले नसल्यामुळे श्वानपालक खोटे बोलत असल्याचे उघड झाले.
हे ही वाचा :
छत्तीसगडमध्ये ३३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; १७ जणांवर ४९ लाखांचे बक्षीस
तेलंगणातील काँग्रेस नेत्याने गमावले संतुलन; केंद्रीय मंत्र्याला दिल्या शिव्या!
आवाज नव्हे उबाठाच कृत्रिम झालाय!
तर ज्या कुत्र्याचे फोटो इंटरनेट मीडियावर प्रसारित झाले होते तो त्याच्या शेजाऱ्याचा कुत्रा होता. विशेष म्हणजे, त्या कुत्र्याची किंमत एक लाख रुपयेही नव्हती. दरम्यान, ईडीने या प्रकरणात परकीय चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कोणताही तपास सुरू केलेला नाही. सूत्रांनी पुढे सांगितले की, आंतरराष्ट्रीय पेमेंट, आयात परवाना किंवा ५० कोटी रुपये खर्च केल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. हे सर्व प्रसिद्धी मिळविण्यासाठी रचलेले नाटक होते. त्याचे सर्व दावे खोटे आहेत.