देशभरात गेल्या काही वर्षांत ईडीने विविध राजकीय नेत्यांवर धाडी टाकलेल्या आहेत, पण पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी धाड टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. २४ परगणा उत्तर याठिकाणी ही घटना घडली. अन्नपुरवठा घोटाळ्यासंदर्भात ईडीचे अधिकारी धाड टाकण्यासाठी गेले होते.
तृणमूलचे नेते शहाजहाँ शेख यांच्या निवासस्थानी ईडीची टीम पोहोचल्यावर तिथे मोठा जमाव एकत्र आला. त्यांनी हा हल्ला केला. नंतर शेख यांना ईडीने अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना २०० जणांच्या जमावाने घेराव घातला. त्यावेळी या अधिकाऱ्यांसमवेत निमलष्करी दलाचे जवानही होते. या हल्ल्यात काही अधिकारी जखमीही झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ईडी अधिकाऱ्यांच्या वाहनांवरही या जमावाने हल्ला केला आणि त्यांचीही तोडफोड केली.
यासंदर्भात भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रदेश अध्यक्ष सुकांत मुजुमदार म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर येथील रोहिंग्य कसा हल्ला करत आहेत, त्याचे हे उदाहरण आहे. ज्यांच्यावर ही धाड घातली आहे त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप आहे. पण रोहिंग्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला पायदळी तुडवले आहे.
विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी आरोप केला की, पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यांनी आपल्या एक्स हँडलवर लिहिले आहे की, पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्था नष्ट झाली आहे. तृणमूलचे नेते शेख यांच्या घरावर धाड टाकण्यात आल्यानंतर हा हल्ला करण्यात आला. ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या जमावात रोहिंग्या असण्याची शक्यता दाट आहे.
हे ही वाचा:
भारत-नेपाळ संबंधांना मिळाली नवी ‘ऊर्जा’ ; जलविद्युत मेगा करार
चक्क चीनने केले मोदी सरकारचे कौतुक! जगात दर्जा वाढला
पर्यटन, आदरातिथ्य क्षेत्राला आला बहर
मुंबई आयआयटी; मुलांना कोटीकोटी
सुवेंदु अधिकारी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांना विनंती केली आहे की, या घटनेची त्यांची गंभीरपणे दखल घ्यावी आणि राज्यातील अराजक संपविण्यासाठी कठोर पावले उचलावीत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणी चौकशी करण्याची मागणीही अधिकारी यांनी केली आहे.
गेले काही महिने अन्नपुरवठा घोटाळ्याच्या निमित्ताने ईडीने पश्चिम बंगालमध्ये धाडींचे सत्र सुरू केले आहे. त्यात आरोप असा आहे की, सार्वजनिक अन्नधान्यवितरण प्रणालीतून ३० टक्के पदार्थ हे खुल्या बाजारात विकले जात आहेत. सरकारने दिलेल्या किमान हमीची रक्कम आपल्या खात्यात वळविण्याचा उद्योग काही लोकांनी सुरू केला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या नावाने खोटी खाती तयार करण्यात आल्याचाही आरोप आहे. गेली अनेक वर्षे हा गैरप्रकार सुरू असल्याचेही ईडीचे म्हणणे आहे.