समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना केंद्रीय तपास संस्था बंद करायच्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सीबीआयची आवश्यकता का आहे, असा प्रश्न विचारला. त्यांनी भाजपवर केंद्रीय तपास संस्थेच्या गैरवापराचा आरोप केला आहे. तसेच, समाजवादी पक्ष कधीच काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही, मात्र समर्थन देत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी पाचव्या टप्प्यांतील मतदान होणार असून त्यामध्ये अमेठी आणि रायबरेलीचाही समावेश आहे.
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत अखिलेश सिंह यांनी काही भूमिका मांडल्या. ‘सीबीआय आणि ईडी बंद केले पाहिजेत. जर तुम्हाला फसवले गेले असेल तर त्यासाठी प्राप्तिकर विभाग आहे. त्यासाठी सीबीआयची आवश्यकता का आहे? आवश्यकता भासल्यास सर्व राज्यांत भ्रष्टाचारविरोधी विभागही आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. केंद्रीय तपास संस्थांचा वापर सरकार बनवण्यासाठी किंवा पाडण्यासाठी होतो, असा दावा त्यांनी केला.
हे ही वाचा:
संसदेची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे!
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरांतून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डर जप्त!
मणिपूरमध्ये दोन तास चकमक; कुकी दहशतवाद्यांपासून ७५ महिलांची सुटका
भाजपच्या उमेदवाराला आठवेळा मत; व्हिडीओतील तरुणाला उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक
नोटाबंदीदरम्यान जे चुकीचे झाले, त्याची चौकशी या केंद्रीय तपास संस्थांनी का केली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच, हा माझा प्रस्ताव असून तो मी इंडिया आघाडीसमोर मांडणार आहे, असेही ते म्हणाले. तसेच, त्यांनी काँग्रेससोबत आघाडी कायम ठेवण्याचीही भूमिका मांडली. ‘आघाडी चालवू. जेव्हा जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा आघाडी असेल. मात्र सध्या तरी आमचे प्रयत्न सरकार बनवण्यासाठी आहेत,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
‘काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही’
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे एक घटकपक्ष राष्ट्रवाद काँग्रेसचे शरद पवार यांनी येत्या काही दिवसांत प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील आणि काही काँग्रेसमध्ये विलिनही होऊ शकतील, असे भाकीत वर्तवले होते. तेव्हा अखिलेश यांनी समाजवादी पक्ष कधीच काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही, असे स्पष्ट केले.