भारताची चांद्रयान- ३ ही मोहीम नुकतीच यशस्वी पूर्ण झाली. यापूर्वी भारताने दोन चंद्र मोहिमा राबविल्या होत्या. यातील पहिली मोहीम यशस्वी झाली होती तर दुसरी मोहीम अपयशी ठरली होती. इस्रोची पहिली चांद्रमोहीम चांद्रयान- १ मुळे चंद्रावर पाण्याच्या अस्तित्वाचा शोध लागला होता. आता याबाबत आणखी एक मोठा खुलासा शास्त्रज्ञांनी केला आहे.
चंद्रावर पाणी तयार होण्यासाठी पृथ्वीवरुन जाणारे हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स कारणीभूत असू शकतात, असं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. चांद्रयान- १ मधून मिळालेल्या रिमोट सेन्सिंग डेटामधून ही गोष्ट उघडकीस आली आहे. चंद्रावर पाणी तयार व्हायला पृथ्वीचं जबाबदार आहे, असं या संशोधनातून समोर आले आहे.
युनिवर्सिटी ऑफ हवाईच्या संशोधकांनी याबाबत अधिक अभ्यास करून शोध लावला आहे. पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या प्लाझ्मा शीटमुळे चंद्रावरील खडकांची झीज होते आहे आणि यामधूनच विविध प्रकारची खनिजे बाहेर पडत असल्याचं या संशोधकांनी म्हटलं आहे. नेचर अॅस्ट्रोनॉमी या विज्ञान विषयक जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.
यापूर्वी चंद्राच्या पृष्ठभागावर होणाऱ्या बदलांसाठी पूर्णपणे सौरवादळं कारणीभूत आहेत असं मानलं जात होतं. मात्र, चंद्र पृथ्वीच्या मॅग्नेटोटेलमधून जात असताना त्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. तर अशा वेळी देखील चंद्राच्या पृष्ठभागावर परिणाम होत असल्याचं दिसून आलं.
“चंद्र पृथ्वीच्या मागे असताना त्यावर सौर हवा आदळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे अशा वेळी चंद्रावर पाणी तयार होण्याची शक्यताही शून्य होती. मात्र, अशा वेळी देखील त्याठिकाणी पाणी तयार होत असल्याचं रिमोट सेन्सिंग डेटामधून दिसून आलं,” अशी माहिती असिस्टंट रिसर्चर शुआई ली यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
उद्धवजी दंगली कोण घडवतायत ते जरा बघा
गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी
चार जवान शहीद म्हणजेच पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ कायम असल्याचे संकेत
बॉलीवूडमधील सेलिब्रेटी ईडीच्या रडारवर
चांद्रयान- १ ने २००८ आणि २००९ साली गोळा केलेल्या रिमोट सेन्सिंग डेटाचा वापर या संशोधनासाठी ली आणि त्यांच्या टीमने केला. चांद्रयानातील मून मायनेरॅलॉजी मॅपर इन्स्ट्रुमेंटने हा डेटा गोळा केला होता. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने ऑक्टोबर २००८ मध्ये चांद्रयान- १ लाँच केले होते. यामध्ये एक ऑर्बिटर चंद्राचे निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आले होते.