निसर्गरम्य कास पठारला आता ई- बसने जा

सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार आहे.

निसर्गरम्य कास पठारला आता ई- बसने जा

सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार आहे. राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते तिथे सुरू करण्यात येत असलेल्या चार ई बसेसचे तसेच बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण करण्यात आले आहे. तसेच कास येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे, दर्शन गॅलरी (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करणे, स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा तयार करणे, सुरक्षा वाढवणे, घनकचरा व्यवस्थापन याबाबतही कार्यवाही करण्यात येईल, असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले आहे.

मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते दूरचित्रप्रणालीव्दारे ई- बसेसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी स्थानिकांना रोजगार वाढवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू, असे आवाहनही केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि तिथले सरपंच यांचे आभार मानले.

“पर्यटन विकासासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे. स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असलेले कास पर्यटनाचा ठेवा जपण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर वाढून नैसर्गिक रित्या कास पठार अधिक फुलावे यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने नवीन महाबळेश्वरचे जे धोरण तयार केले आहे त्यामध्येही कास पठारच्या विकासाला निश्चीत वाव देण्यात येईल,” अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

“कास पठारावील प्रदुषण रोखण्यासाठी ई- बसची सेवा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा शासनाचा निर्णय चांगला आहे. कास पठारावरील प्रदुषण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत व वन विभागाची वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना आणखी सुविधा तसेच नवीन पर्यटन स्थळांची निर्मिती करावी. यासाठी नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

कास पठारावरील फुले पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. येथील प्रदुषण कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ई- बस सेवा सुरु करण्यात येत आहे. ह्या ई- बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळकडून उपलब्ध झालेल्या आहेत. पर्यटकांचा प्रतिसाद पाहून पुढील वर्षीपासून आणखी ई- बसेसचे नियोजन केले जाईल. तसेच कास संवर्धनासाठी आणखीन उपाययोजना केल्या जातील अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. यावेळी अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, पर्यटन संचालक मिलींद बोरीकर, सहसंचालक धनंजय सावळकर उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणालीव्दारे सातारा येथून आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

साताऱ्यातील कास पठार

सातारा शहरापासून २५ कि.मी. अंतरावर सहयाद्री पर्वतराजीत निसर्गरम्य असे कास पठार आहे. या पठारावर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात विविध रंगांच्या, प्रजातींच्या फुलांचा बहर पाहायला मिळतो. जवळपास ८५० वनस्पतींच्या प्रजाती या ठिकाणी पहायला मिळतात. वनस्पती विज्ञानासाठी अजूनही नवीन असलेल्या अनेक जाती पठारावर आढळतात. तसेच अनेक स्थानिक व लुप्त होत चालेल्या वनस्पती सुद्धा इथे आढळून येतात. गेल्या चार ते पाच वर्षांपासून हे स्थळ पर्यटकांना आकर्षित करत आहे. तर कास पठाराला हंगामात दररोज ३ हजार पेक्षा जास्त पर्यटक भेट देतात.

हे ही वाचा:

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?

… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र

‘ज्यांना दूध पाजले म्हणता त्या शिवसैनिकांचा त्याग, मेहनत आहे पक्षवाढीत’

युनेस्कोने देखील कास पठाराला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. हे स्थळ राखीव वन व जैवविविधतेचे भंडार असले तरी येथील नैसर्गिक वनसंपत्तीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. पर्यटन विभाग पर्यावरण पुरक पर्यटन संकल्पनेअंतर्गत या ठिकाणी या हंगामा करिता ४ ई-बसेस सुरु करण्यात येत आहेत. बसेस कासने गावापासून कास पाठरापर्यंत अर्धा कि.मी. पर्यंत चालविण्यात येतील. यामुळे या परिसरात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणास आळा बसण्यास मदत होईल.

कास पठाराच्या परिसरात ठोसेघरचा धबधबा, बामनोली येथे कोयनेचा जलाशय, वासोटा किल्ला, सज्जनगड किल्ला अशी विविध पर्यटन स्थळे देखील आहेत. पर्यटन विभागच्या माध्यमातून बामनोली येथे नवीन जलक्रिडा केंद्र उभारण्यासाठी ४५ कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आला आहे. एकंदरीत या संपूर्ण परिसरास एक एकात्मिक टुरिझम सर्कीट विकसीत करण्यात येईल आणि त्यातुन या भागातल्या स्थानिक युवकांना रोजगार मिळेल तसेच आर्थिक विकासाला चालना दिली जाईल.

Exit mobile version