टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांसह हॉटेलांचे गणितही बिघडले आहे. त्यामुळे अनेक हॉटेलांनी शाकाहारी आणि मांसाहारी थाळीमध्ये अनुक्रमे २८ टक्के आणि ११ टक्के वाढ केली आहे. ‘शाकाहारी थाळीमध्ये २८ टक्के वाढ केली असली तरी त्यातील २२ टक्के वाढ ही एकट्या टोमॅटोमुळे झाली आहे. टोमॅटोच्या दरात एका महिन्यात तब्बल २३३ टक्के वाढ झाली आहे. जूनमध्ये टोमॅटोचे दर ३३ रुपये किलो होते, तर जुलैमध्ये तेच ११० रुपये किलोवर पोहोचले,’ असे क्रिसिलच्या अहवालात नोंद करण्यात आले आहे.
कांदा आणि बटाट्याच्या किमतीत अनुक्रमे १६ आणि ९ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात एकूण खर्चात आणखी वाढ झाली. टोमॅटोचे दर गगनाला भिडल्यामुळे सरकारलाही टीकेचा सामना करावा लागला होता. टोमॅटोच्या कमी पुरवठ्यामुळे टोमॅटोची मागणी वाढली आणि त्यांच्या दरात वाढ झाली.
एमके ग्लोबल या अर्थविषयक सेवा देणाऱ्या कंपनीच्या विश्लेषणानुसार, धान्यांच्या किमतीत (३.५ टक्के), डाळींमध्ये (७.७ टक्के), भाज्या (९५ टक्के) आणि दूध (१०.४ टक्के) सरासरी वाढ झाली आहे. ही वाढ दरवर्षीच्या तुलनेत अधिक असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर, तेलाच्या किमतीत मात्र १७ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. ‘टोमॅटोचे दर ऑगस्टअखेरीस तरी उतरण्याची चिन्हे नाहीत. तर, गेल्या काही आठवड्यांपासून भाज्याही महाग होऊ लागल्या आहेत,’ असे एमके ग्लोबलच्या अर्थतज्ज्ञ माधवी अरोरा यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मोहोब्बत की दुकान, चायना का सामान; भारतविरोधी कारवायांसाठी चीनचे न्यूजक्लिकला फंडिंग
हरमनप्रीत सिंगचा १५०वा गोल, भारताने मलेशियाला केले पराभूत
अविश्वास ठरावासाठी बीजेडीचा मोदी यांना पाठिंबा का?
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याचा कोणताही पुरावा नाही
क्रिसिलच्या अहवालानुसार, मांसाहारी थाळीच्या किमतीत अल्प वाढ झाली आहे. त्याचे कारण आहे ब्रॉयलर चिकनची किंमत. मांसाहारी थाळीमध्ये ब्रॉयलर चिकनचा खर्च हा सुमारे ५० टक्के असतो. मात्र जुलै महिन्यात या चिकनच्या दरात तीन ते पाच टक्के घट झाल्याने मांसाहारी थाळीची किंमत फारशी वाढवण्यात आलेली नाही. मिरच्या आणि जिऱ्याच्या किमतीनेही उसळी मारली आहे. जुलैमध्ये त्यांच्या दरात अनुक्रमे ६९ टक्के आणि १६ टक्के वाढ झाली आहे. मात्र या दोन्ही पदार्थांचा वापर थाळीमध्ये फार कमी प्रमाणात होत असल्याने त्याचा एकूण थाळीच्या किमतीत फारसा परिणाम झालेला नाही. त्यातच खाद्यतेलाच्या किमतीतही घट झाल्याने गृहिणींसह हॉटेलांनाही थोडा दिलासा मिळाला आहे.