गाझियाबादमधील एका १४ वर्षीय मुलाला कुत्रा चावला होता. मात्र त्याने ते लपवून ठेवले मात्र काही कालावधीनंतर त्याच्यात भयंकर लक्षणे दिसू लागली. या मुलाला एका कुत्र्याने महिनाभरापूर्वीच चावले होते. मात्र त्याने ही बाब आपल्या आई-वडिलांपासून लपवून ठेवली होती.
या मुलाच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने पाच ते सहा कुत्रे पाळले आहेत. तसेच, ती परिसरातील भटक्या कुत्र्यांनाही अन्नपदार्थ देत असे. त्यातीलच एका कुत्र्याने या मुलाचा चावा घेतला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या मुलाचे नाव साबेझ असे असून तो गझियाबाद येथे राहात होता. याच परिसरातील कुत्र्यांनी यापूर्वीही अनेकांना चावा घेतला होता, असे सांगितले जाते. साबेझला महिनाभरापूर्वी एका कुत्र्याने चावा घेतला होता. मात्र त्याने भीतीने या प्रकाराची वाच्यता कुटुंबीयांकडे केली नाही. त्यानंतर चार दिवसांनी त्याच्यात रेबिज आजाराची लक्षणे दिसू लागली, अशी माहिती साबेझच्या आजोबांनी दिली.
त्याच्या कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, साबेझला वारा आणि पाण्याची भीती वाटत असे. त्याने अंधाराताच राहण्यास सुरुवात केली होती. तो खूप घाबरला होता आणि मोठमोठ्याने आवाज करत असे. त्यामुळे साबेझला गाझियाबाद, मेरठची रुग्णालये आणि दिल्लीच्या एम्स रुग्णालयातही नेण्यात आले होते. त्याला बुलंदशहर येथेही उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र बुलंदशहर येथून परतताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला, असे साबेझचे वडील याकूब यांनी सांगितले.
हे ही वाचा:
इंडिया आघाडीच्या पुढील बैठकांना पूर्णविराम; संजय राऊतांनी सांगितले कारण
पंतप्रधानांची सुरक्षा सांभाळणारे अरुणकुमार सिन्हा यांचे निधन
राज ठाकरेंना विसर पडला, पवारांनाच मराठा आरक्षण नको होते…
आदीत्य ठाकरे आता स्टॅलिनलाही मिठी मारा…
या घटनेप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी साबेझच्या कुटुंबीयांनी केली आहे. तसेच, अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासनाने पावले उचलावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या तक्रारीवरून गाझियाबाद महापालिकेने भटक्या कुत्र्यांना अन्नपदार्थ देणाऱ्या महिलेला नोटीस बजावली आहे.
नियमबाह्य पद्धतीने या कुत्र्यांना वागवले जात असून ते सतत भुंकत असल्याचे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, या कुत्र्यांचे नियमित लसीकरण केले जाते की नाही, याचीदेखील माहिती पालिकेने या महिलेकडे मागितली आहे. गाझियाबाद महापालिकेच्या नियमानुसार, प्रत्येक पाळीव कुत्र्याची नोंद करणे तसेच, त्याचे लसीकरण बंधनकारक आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी तिला तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तसेच, कुत्र्यांचा नोंदणी क्रमांक कळवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसे न केल्यास तिला पाच हजार रुपये दंड ठोठावला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.