श्रीलंकेच्या सरकारने भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शहा यांची अधिकृतपणे माफी मागितली आहे. श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा यांनी जय शहा यांच्यामुळे श्रीलंका क्रिकेट संघाचा पराभव झाल्याचे मत व्यक्त केले होते. त्यासंदर्भात श्रीलंका क्रिकेट बोर्डाने हा माफीनामा सादर केला आहे.
रणतुंगा यांनी म्हटले होते की, श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि जय शहा यांच्यातील संबंधांमुळे बीसीसीआयची अशी धारणा होती की, ते श्रीलंका क्रिकेट बोर्डावर नियंत्रण मिळवू शकतील. जय शहा हेच एकप्रकारे श्रीलंका क्रिकेट बोर्ड चालवत होते. जय शहा यांच्या दबावामुळेच श्रीलंका क्रिकेट बोर्ड उद्ध्वस्त झाले. भारतातील एक माणूस श्रीलंका क्रिकेटच्या अवस्थेला कारणीभूत आहे. आपल्या वडिलांमुळे तो शक्तिशाली बनला आहे. त्याचे वडील हे भारताचे गृहमंत्री आहेत.
रणतुंगा यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली. श्रीलंकेच्या संसदेतही याचे पडसाद उमटले. हरिन फर्नांडो आणि कांचना विजेसेकरा यांनी या विधानाची जबाबदारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाची असल्याचे आणि त्याचा परराष्ट्र खात्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले. विजेसेकरा म्हणाले की, सरकार या नात्याने आम्ही आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख जय शहा यांची माफी मागतो. आमच्या संघटनेतील दोषासाठी आम्ही आशियाई क्रिकेट परिषदेचे सचिव किंवा इतर देशांना जबाबदार धरू शकत नाही. ते चुकीचे ठरेल.
हे ही वाचा:
दिवाळीनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे महत्त्वाचे निर्णय
ललित पाटील प्रकरणी पुणे पोलीस दलातील दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक
वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहायला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार
मराठा आरक्षणासाठी नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या
दरम्यान, पर्यटन मंत्री हरिन फर्नांडो यांनी सांगितले की, राष्ट्रप्रमुख राणिल विक्रमसिंघे यांनी जय शहा यांच्याशी संपर्क साधला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डावर आयसीसीकडून जी बंदी घालण्यात आली आहे, त्यासंदर्भात लक्ष घालावे यासाठी ही बोलणी झाली आहेत.
फर्नांडो यांनी म्हटले की, आयसीसीने जी बंदी घातली आहे त्यामुळे देशावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. जर आयसीसीने ही बंदी उठविली नाही तर श्रीलंकेत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांना कुणीही येणार नाही. पुढील वर्षी १९ वर्षांखालील मुलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा श्रीलंकेत होत आहे. त्यामुळे अशा स्पर्धेला कुणीही आले नाही तर या स्पर्धेतून सरकारला एकही पैसा मिळणार नाही.