गेल्या सहा महिन्यांत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुन्या महामार्गावरील एकूण अपघातांत तब्बल २१ टक्के घट झाली आहे. डिसेंबर २०२२ ते मे २०२३ या कालावधीत सुमारे ४० हजार बेशिस्त वाहनचालकांवर बडगा उगारण्यात आला. त्यातील वेमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या आठ हजार १२४ चालकांचा समावेश होता. वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कडक कारवाईमुळे अपघातांची संख्या घटल्याने अपघाती मृतांच्या संख्येतही १० टक्क्यांनी घसरण झाल्याचे राज्याचे वाहतूक पोलिस आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले.
दोन्ही मुंबई-पुणे महामार्गांवर जानेवारी ते एप्रिल २०२२ दरम्यान ९४ अपघातांची नोंद झाली होती. मात्र याच कालावधीत याच वर्षी ७४ अपघात झाले आहेत. तसेच, २०२२मध्ये ६१ जणांचा मृत्यू झाला होता. तर या कालावधीत ५५ जणांना जीव गमवावा लागला, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त (रस्ते सुरक्षा) भरत काळसकर यांनी दिली.
समृद्धी महामार्गावरही अपघातांची संख्या वाढल्याने आरटीओची ही मोहीम या मार्गावरही राबवण्याचा विचार सुरू असल्याचे भिमनवार यांनी सांगितले. असे झाल्यास समृद्धी महामार्गावरही वेगाची तपासणी, लेन कटिंग आणि अन्य वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांची नेमणूक केली जाईल. ‘वाहतूक नियम मोडणाऱ्यांना जागच्या जागी पकडण्यासाठी आणि त्यांना ई-चलान देण्यासाठी अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि इंटरसेप्टर वाहने तैनात करण्याचा आम्ही विचार करत आहोत,’ असेही भिमनवार यांनी सांगितले.
या सहा महिन्यांत एक्स्प्रेसवे आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सीटबेल्ट न लावून गाडी चालवणाऱ्या सुमारे सहा हजार ६८५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा गाडी अपघातात मृत्यू झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारचे अपघात होऊ नये, यासाठी विशेष मोहीम राबवली आहे.
हे ही वाचा:
मोदी म्हणाले, परदेश दौऱ्यात तिथले विरोधकही आपल्या देशासाठी कार्यक्रमांना उपस्थित होते!
संसदभवन उद्घाटनावर बहिष्कार हे विरोधकांच्या वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक
वीजचोरी पकडणाऱ्या महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला
व्हिएतनाममध्ये अदानी कंपनी करणार गुंतवणूक
वाहतूक पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या जानेवारीत सर्वाधिक (२५०८) होती, तर फेब्रुवारीत (१५९६) होती. त्यानंतर दोन महिन्यांत ती एक हजारावर घसरली. तर मेमध्ये पुन्हा (१ १४१) वाढली. सीटबेल्ट न बांधणाऱ्या सर्वाधिक वाहनचालकांची संख्या जानेवारीमध्ये(१५४१) नोंदली गेली. तर, लेन कटिंग करणाऱ्या सात हजार २८७ वाहनचालकांवर कारवाई करण्यत आली. त्यातील बहुतेक चालक हे ट्रकचालक होते. ट्रकचालक हे उजवीकडून जात असल्याने गाडी आणि एसयूव्हीचालकांना ओव्हरटेक करण्यात अडथळे येतात, अशी तक्रार अनेक गाडीचालकांनी केली होती.