विभागीय आणि राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करत दहिसर येथील व्हीपीएम विद्यामंदिर शाळेच्या द्रिशीका बंगेराने राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान पटकावले आहे. उलवे, रायगडला झालेल्या विभागीय शालेय स्पर्धेत द्रिशीका हिने १४ वर्षाखालील मुलींच्या थाळीफेकमध्ये सुवर्ण आणि गोळाफेक मधे रौप्यपदक पटकावले आणि त्यानंतर डेरवण, चिपळूणला पार पडलेल्या राज्य स्पर्धेतही आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत थाळीफेक मधे रौप्यपदक कमावत राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा आपला मार्ग मोकळा केला.
उपनगरातील शेवटच्या टोकावर असलेल्या आणि फारशा सुविधा नसूनही विद्यामंदिर शाळेने ॲथलेटिक्ससारख्या सर्वात कठीण अशा ऑलिम्पिक खेळाला प्राधान्य देत सातत्याने राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. मुख्य प्रशिक्षक संतोष आंब्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक मेहनतीने हे यश मिळाले असून खेळाडूनी सुद्धा ही परंपरा कायम ठेवण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे या प्रयत्नांना शाळेच्या संचालक मंडळाचे कायम मोठे सहकार्य मिळाले आहे.
हे ही वाचा:
मालेगावात १२५ कोटींचे इंधन आले कुठून?
भास्कर जाधव म्हणाले, काँग्रेसचे सुनील केदार म्हणजे मारुतीच्या बेंबीतला विंचू!
दलवाई म्हणतात, आरएसएस दहशतवादी, भाजपने मारले जोडे!
एनआयएकडून गैर-स्थानिकांच्या हत्येमधील दहशतवाद्याची मालमत्ता जप्त
विद्यामंदिर शाळेशी संलग्न असलेल्या व्हीपीएम स्पोर्ट्स क्लबने डेरवनला आपल्या कामगिरीचा डंका वाजवताना १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ ब्राँझ अशी चार पदक पटकावण्याची प्रभावी कामगिरी केली. विधी सावंतने हाथोडा स्पर्धेत ४३.७ मीटर अशी कामगिरी करत सुवर्ण मिळवले. तर, गाथा कबीर, कानवी पांचाळ यांनी प्रत्येकी रौप्य, तर सिमरन पोगार ब्राँझ पदक मिळवले. द्रिशिका बरोबर विधी सावंत, गाथा कबीर, कानवी पांचाळ यांची राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे .