डीआरडीओने विकसित केलेली यंत्रणा
भारतीय सैन्याच्या ताफ्यात नव्या शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टम (एसएसबीएस) – १० याचा समावेश करण्यात आला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओ या संस्थेने ही यंत्रणा विकसित केलेली आहे. शुक्रवार, २ जुलै रोजी या ब्रिजिंग सिस्टिमची पहिली खेप भारतीय सैन्याकडे पोहोचवली गेली. या पहिल्या खेपेत एकूण १२ अशा सिस्टिम्सचा समावेश करण्यात आला आहे. करिअप्पा परेड मैदान, दिल्ली कॅन्ट.येथे झालेल्या एका समारंभात लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी भारतीय सैन्यात ही सिस्टिम दाखल करून घेतली. यावेळी संरक्षण व विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी उपस्थित होते.
ही नवी शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टिम ही भारतीय सैन्याच्या दृष्टीने फारच उपयुक्त ठरणार आहे. एसएसबीएस हा १० मीटर लांबीचा पूल ९.५ मीटर अंतराची दरी साधण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावेल. या यंत्रणेमुळे ४ मीटर रुंदीचा रस्ता तयार होऊन सैन्याच्या हालचाली अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे. पुणे येथील ‘संशोधन व विकास आस्थापना (इंजि.)’ या डीआरडीओच्या अग्रणी अभियांत्रिकी प्रयोगशाळेने ही यंत्रणा तयार केली असून या यंत्रणेच्या विकासात एल अँड टी या खासगी कंपनीने सहकार्य केले आहे.
हे ही वाचा:
रावत यांनी मोडला कोश्यारींचा विक्रम
तुम्हाला खुर्ची उबवायला दिली आहे काय?
जीएसटीमुळे अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन पर्यंत पोहोचेल
मराठी वाऱ्यावर; पण ठाकरे सरकारला उर्दूची काळजी
या प्रणालीचा यशस्वीपणे विकास करून भारतीय लष्करात समावेश झाल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय सैन्य व उद्योग क्षेत्र यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, यामुळे वेगाने वाढणाऱ्या भारतीय संरक्षण औद्योगिक परिसंस्थेला चालना मिळेल आणि उद्योगांना ‘आत्मनिर्भर भारत’ साठी योगदान देण्यात मदत होईल. तर या ब्रिजिंग सिस्टमचा भारतीय लष्करात समावेश झाल्याबद्दल डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनीदेखील या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी असलेल्या चमूंचे अभिनंदन केले.