भारताने पाचव्या कसोटीतही इंग्लंडचा धुव्वा उडवला. आघाडीच्या खेळाडूंच्या अनुपस्थित भारताने ही कामगिरी केली. यावेळी रोहित शर्मा याने कर्णधाराला साजेशी खेळी केलीच, शिवाय शेवटच्या फळीतील गोलंदाज कुलदीप यादव यानेही त्याच्या बॅटची करामत दाखवली. त्यामुळे आता फलंदाजी करण्यासाठी कुलदीपला ‘प्रमोशन’ मिळणार का, असे विचारले असता प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांनी हसत हसत त्यासाठी आधी रवीचंद्रन आश्विन आणि रवींद्र जाडेजाला विचारावे लागेल, असे उत्तर दिले.
रांचीमध्ये पहिल्या इनिंगमध्ये भारत १३४ धावांनी पिछाडीवर होता. मात्र जुरेल याने ९० धावा करून ही आघाडी केवळ ४६ धावांपर्यंत आणली. ही खेळी महत्त्वाची ठरली. त्यानंतर भारताने हा सामना पाच विकेटने जिंकला. मात्र दुसऱ्या बाजूला भक्कमपणे उभा राहून १३१ चेंडूत २८ धावा करणाऱ्या कुलदीपशिवाय हे शक्य झाले नसते. तर, धर्मशाला कसोटी सामन्यात कुलदीपने ६९ चेंडूंत ३० धावा केल्या. इतकेच नव्हे तर कुलदीपने १९ विकेटही घेतल्या. याबाबत बोलताना कर्णधार रोहित शर्मा याने कुलदीपने फलंदाजीवर मेहनत घ्यावी, यासाठी त्याला केलेल्या आग्रहाबाबत भाष्य केले.
हे ही वाचा:
सात्विक-चिराग जोडीची दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन चॅम्पियन्सला गवसणी!
अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रॅव्हल बसवर गोळीबार
ठाकरे आणि पवार गटावर वंचित नाराज; मविआमध्ये लफडा असल्याची कबुली
बजरंग पुनिया, रवी दाहिया पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर?
‘कुलदीपने दुखापतीतून सावरल्यानंतर गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. त्याला काय करायचे आहे, हे त्याला चांगलेच माहीत आहे. तो परत गेल्यानंतर प्रशिक्षकासोबत मेहनत घेतो, येथेही मेहनत घेतो. सरावाच्या वेळी तो केवळ स्टम्प ठेवून नेम साधण्याचा प्रयत्न करतो. मात्र मी त्याला फलंदाजीसाठीही सातत्याने प्रोत्साहन दिले. कारण जेव्हा तुम्ही आठव्या किंवा नवव्या क्रमांकावर खेळायला येता, तेव्हा तुम्हाला याचा नक्की फायदा होतो. तुम्हाला जेव्हा धावा हव्या असतात, तेव्हा ते महत्त्वाचे असते.
त्याच्यात फलंदाजीची क्षमता आहे तसेच, त्याला काही शॉट्सही खेळता येतात,’ असे रोहित शर्मा म्हणाला. त्यावर मग कुलदीपला फलंदाजामध्ये प्रमोशन मिळणार का, असे विचारल्यावर रोहित हसला. तेव्हा त्याने अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्या नावावर आतापर्यंत नऊ कसोटी शतके असल्याची आठवण करून दिली. ‘तुम्हाला त्यासाठी अश्विन आणि जाडेजाशी बोलावे लागेल,’ असे उत्तर रोहितने दिले. त्यावर द्रविडनेही हस्तक्षेप करत ‘प्रमोशन हवे असल्यास त्याला त्यासाठी किमान तीन कसोटी शतके करावी लागतील,’ असे द्रविड म्हणाले. रोहितने कुलदीपच्या कामगिरीमुळे भारताची फलंदाजी मजबूत झाल्याची कबुली दिली.