येणाऱ्या पावसाळ्यात मुंबईत पाणी कोठेही तुंबू नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापालिकेकडून मुंबईतील नालेसफाई युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. गेल्यावर्षी मुंबईत पाणी तुंबले नव्हते, यावर्षीही तशीच स्थिती असेल, असा मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला. मुंबईतील नालेसफाईची पाहणी आज मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा..
राजस्थानमध्ये उष्णतेचे ‘अर्धशतक’; फलोदीत ५० अंश तापमान
सराफा व्यावसायिकांवर छाप्यात २६ कोटींची रोकड, ९० कोटींचे बेहिशेबी दस्तावेज जप्त!
‘ठाकरे’ राऊतांवर भडकले…गडकरींबद्दलच्या वक्तव्यावरून नाराजी!
राजकोट गेमिंग झोनमध्ये अग्नितांडवात २८ मृत्यू, अग्निशमन विभागाची परवानगी नव्हती
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईत सर्वत्र सुमारे ५४ हजार २२५ वाहनाचा वापर करून गाळ काढण्याचे काम करण्यात येत आहे. हिंदमाता, मिलन सबवे सारख्या ठिकाणी पाणी साचते तिथे ४८२ पंप लावण्यात आले आहेत. समुद्राला भरती असते तेव्हा पाणी नागरी भागात जाऊन नुकसान होते त्यामुळे ७ कोटी लिटर क्षमतेच्या भूमिगत टाक्या बसवण्यात आल्या आहेत.
मिठी नदी, जे. के. केमिकल, वांद्रे-कुर्ला संकुल, दहिसर नदी या ठिकाणी पाहणी करून नाले पूर्ववत करण्याचा आमचा मानस आहे. दरड कोसळण्याच्या ठिकाणचा आढावा घेण्यात आला असून अशी ठिकाणे नक्की करण्यात आली आहेत. त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना एमएमआरडीए च्या घरामध्ये राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात येणार आहे. दरड कोसळण्याच्या ठिकाणी सेफ्टी नेट लावण्यात येईल, जेणेकरून ती ठिकाणे संरक्षित होतील, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नाला रुंदीकरण तसेच त्याठिकाणी असलेली अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. त्या भागात राहणाऱ्या लोकानाही निवारा देण्यात येईल, त्यांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहान त्यांनी केले. नाल्यात हार्ड बेस लागेपर्यंत गाळ काढण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जलपर्णी काढण्यासाठी मशिनरी तैनात आहे. रेल्वे सोबत डीप क्लीन ड्राइव्ह घेण्याचा विचार आहे. रेल्वे हद्दीतील स्वच्छता करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल.
पालिकेने हेल्पलाईन क्रमांक जारी केला असून त्यावर डेब्रिज असेल किंवा कचरा असेल याचे फोटो अपलोड करावेत, जेणेकरून पालिका अधिकारी त्या भागातील स्वच्छता करतील. जे प्रकल्प रखडलेले आहेत, त्या प्रकल्पांचा विकास सरकार करण्याच्या विचारात असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.