मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांगमध्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणातून सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्षमय जीवनाच्या विविध आयामांवर आणि देशभक्तीवर प्रकाश टाकला. तसेच त्यांनी आजच्या पिढीला सुभाषचंद्र बोस यांच्या आदर्शावर चालण्याचे आवाहन केले आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती असून आपण दरवर्षी त्यांचे स्मरण करतो. पण, हे वर्ष विशेष आहे कारण देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यासाठी नेताजींनी घर सोडले, ते परदेशात गेले, सैन्य बनवले आणि इंग्रजांशी लढले. आपल्या सुखाची चिंता न करता त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले. त्यांचे जीवन आपल्यासाठी एक उदाहरण आहे.
संघप्रमुख म्हणाले की, “नेताजींनी सर्व भारतीयांना एकत्र केले, इंग्रजांशी एवढा संघर्ष केला. देशभक्ती म्हणजे संपूर्ण देशासाठी काम करणे. आपल्या देशातील लोकांशी मतभेत झाले तरी वाद न घालता देश सेवा करणे. नेताजींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली, यामागे काहीतरी कारण असावे, काय होते माहीत नाही, पण गांधीजींची इच्छा नव्हती. बहुमत नेताजींसोबत होते, त्यांच्यात भांडणे होऊ शकली असती, पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी माघार घेतली. कारण परकीय सत्तेशी लढायचे असेल तर देश एक झाला पाहिजे, एक राहिला पाहिजे. स्वार्थाचा त्याग करून देशहितासाठी लढणारे, असे ते होते, असे सरसंघचालक म्हणाले.
हे ही वाचा:
चीन नरमला; अपहृत तरुणाची करणार सुटका
नागपुरात एमपीएसी पेपरफुटी प्रकरणामुळे खळबळ; अभाविपचे तीव्र आंदोलन
ओमायक्रोनच्या धास्तीने ‘या’ पंतप्रधानांनी त्यांचच लग्न केलं रद्द
…अमिताभने लेस बांधताना दिली मुलाखतीची अपॉइंटमेंट
नेताजींच्या सैन्यात संपूर्ण देशातील लोक होते. संपूर्ण देशाला एकत्र आणण्याची ताकद त्यांच्यात होती. कारण, त्यांनी स्वत: संपूर्ण भारतालाच आपला देश मानले होते. ही राष्ट्रीय प्रवृत्ती आहे, असे मोहन भागवत म्हणाले. त्यांनी स्वतःसाठी काहीही केले नाही. देशासाठी सर्व काही दिले, असे त्यांचे जीवन आहे, असे सरसंघचालक म्हणाले. देशाचे नाव मोठे करायचे असेल आणि देशाचे नाव मोठे ठेवायचे असेल तर अशा व्यक्तींची देशात नेहमीच गरज भासते. त्यांचा हा प्रवास नेहमी लक्षात ठेवा आणि तसे बनण्याचा प्रयत्न करा, मोहन भागवत म्हणाले.
डॉ. मोहन भागवत म्हणाले की, “आपण सर्वांनी त्यांच्या मार्गावर चालले पाहिजे, आपण सुभाषबाबू बनू शकत नाही, परंतु आपण आज जे आहोत त्यापेक्षा पाच पाऊले नक्कीच चांगले बनू शकतो. कारण, असे बनून स्वत:च्या जीवनात आणि राष्ट्रामध्ये जो बदल घडून येतो, तो सर्वांच्याच हिताचा असतो. त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता हा संदेश आपण स्मरणात ठेवला पाहिजे आणि आपल्या जीवनात त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सरसंघचालक म्हणाले.