माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांची अंतयात्रा सुरु झाली आहे. काही वेळात दिल्लीच्या निगमबोध घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री ९२ व्या वर्षी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये निधन झाले. ते भारताचे १३ वे पंतप्रधान होते. त्यांनी मे २००४ ते मे २०१४ पर्यंत केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारचे नेतृत्व केले.
हेही वाचा..
मुंबईत सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या तरुणाची आत्महत्या
कुर्ल्याप्रमाणे घाटकोपर मध्ये भरधाव टेम्पो बाजारात घुसला
डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. असे गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. गुरुवारी रात्री ८.०६ वाजता त्यांना नवी दिल्लीतील एम्स येथे वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत आणण्यात आले. सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवण्यात यश आले नाही. रात्री ९.५१ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हातून काँग्रेसच्या पराभवानंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्त झालेले डॉ. मनमोहन सिंग यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये राज्यसभेत शेवटची उपस्थिती लावली. ते राज्यसभेचे सदस्य होते.