डॉ. मनमोहन सिंग अनंतात विलीन

शोकाकुल वातावरणात पार पडले अंत्यसंस्कार

डॉ. मनमोहन सिंग अनंतात विलीन

माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज नवी दिल्लीतील निगम बोध घाट येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशातील प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. याशिवाय अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, श्रीलंका, चीन आणि पाकिस्तानच्या नेत्यांनी सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
भारताच्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या कन्येने अंत्यविधी केले.
शनिवारी सकाळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंतिम प्रवासाला एआयसीसी मुख्यालयातून सुरुवात झाली. मनमोहन सिंग यांचे पार्थिव घेऊन जाणारे फुलांनी सजलेले वाहन “मनमोहन सिंग अमर रहे” च्या जयघोषात काँग्रेस मुख्यालयातून निघाले. मनमोहन सिंग यांचा अंत्यसंस्कार शीख परंपरेनुसार करण्यात आला. तिथे पुरोहितांनी भजन केले. त्यानंतर त्यांचे पार्थिव भारतीय ध्वजात ठेवण्यात आले. एका लष्करी ट्रकमध्ये फुलांनी सजवलेल्या गाडीतून पार्थिव नेण्यात आले.

स्मशानभूमीत पार्थिव चितेवर ठेवण्यापूर्वी ते भगव्या कपड्यात ठेवण्यात आले. डॉ. मनमोहन सिंह यांचे पार्थिव सकाळी ९ च्या आधी त्यांच्या ३ मोतीलाल नेहरू रोडवरील निवासस्थानातून एआयसीसी मुख्यालयात नेण्यात आले. मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांचे अंत्यदर्शनासाठी घेतले.

मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर आणि त्यांच्या एका मुलीनेही त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधानांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सेनेच्या प्रमुखांनीही मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला.

हेही वाचा:

दिल्ली निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर

अभिनेत्री उर्मिला कोठारेंच्या कारने दोघांना उडवले, एकाचा मृत्यू 

फ्लॉवर नही फायर है नितीश रेड्डी!

पोलीस अधिकारी मोहम्मद मोहसीन खानचा पीएचडी कार्यक्रम रद्द

भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार मानले जाणारे डॉ. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ दरम्यान १० वर्षे पंतप्रधान म्हणून काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्यांनी मनमोहन सिंग यांना त्यांच्या मृत्यूनंतर देशाच्या “सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक” म्हटले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि विविध देशांच्या प्रतिनिधींसह अंत्यसंस्काराला उपस्थित होते. सिंह यांच्या स्मारकासाठी जमीन देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ देशभरात सात दिवसांचा राष्ट्रीय शोक पाळला जात असून त्यादरम्यान देशभरात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे.

Exit mobile version